Wednesday 29 November 2017

अर्थक्रांती भाग 7

पैसा वसे मनी…
भाग ०१ – पैसा गरज, अपेक्षा, वास्तव, समज व गैरसमज
------------------------------------------
०७. गरीबीतून वर उठण्याचे मार्ग
------------------------------------------
गरीबीची वृत्ती हा एक रोग आहे. गरीब व्यक्ती हा त्या रोगाने पछाडलेला रुग्ण आहे. काहीजणांवर तर या रोगाचा एवढा प्रभाव आहे की, हा रोग त्यांचा जीवसुध्दा घेऊ शकतो. शेतकरी आत्महत्या किंवा कर्जबाजारी झाल्याने जीवन त्यागणे, ही गरीबीचा रोग सर्वोच्च पातळीला पोहोचलेल्या लोकांची अवस्था आहे. हा रोग अतिशय घातक आहे, मात्र हा रोग बरा केला जाऊ शकतो. त्यामुळे या रोगाचा कोणत्याही थराला पोहोचलेला रुग्ण खडखडीत बरा होऊ शकतो. प्रसिध्द उद्योजक व फोर्ड कारची निर्मिती करणारे हेन्री फोर्ड यांना हा रोग आयुष्यात सात वेळा झाला होता. ते त्यांच्या आयुष्यात सात वेळा दिवाळखोरीत निघाले होते, मात्र त्यांच्या वृत्तीत श्रीमंतीची लक्षणे असल्यामुळे ते लवकर बरे झाले. त्यांनी खूप मोठी कामे सुध्दा केली.

एखादा रोग शरीरातून घालवायचा असेल तर त्याच्यावर प्रेम करुन कसे चालेल? म्हणून गरीबीवर प्रेम करणे सोडून दिले पाहिजे. जे गरीब आहेत त्यांनी विचार श्रीमंतासारखे करायला पाहिजेत. स्वतःला गरीब समजणे सोडून दिले पाहिजे. समजा तुमचा मोबाईल हरवला तर तुम्ही काय करता? मोठ्या प्रमाणात पश्चाताप करता. शोधण्याचा प्रयत्न करता. मनाला फार वाईट वाटून घेता. परत तसाच मोबाईल घ्यायचा तर अवघड गोष्ट आहे असा विचार करता. मोबाईल हरवल्याचे दुःख मनातून काही केल्या जात नाही. थोडावेळ वेगळा विचार करुन पहा. म्हणजे तुम्ही करोडपती असता तर तुम्हाला मोबाईल हरवल्याचे आता जेवढे दुःख झाले आहे तेवढे दुःख झाले असते का? तर अजिबात झाले नसते. मग शोधायचा प्रयत्न करणे चुकीचे आहे का? तर मोबाईल शोधायचा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही, मात्र पश्चाताप करुन किंवा दुःख व्यक्त करुन तो परत मिळत नाही. म्हणून विचार श्रीमंतासारखा केला पाहिजे, त्यामुळे दुःख अथवा पश्चाताप होत नाही. श्रीमंत माणसेसुध्दा मोबाईल हरवल्यावर शोधायचा प्रयत्न करतातच की! त्यांचा महत्त्वाचा data त्या मोबाईल मध्ये असतो. त्यांना तो हवा असतो. मात्र दुःख करण्यात जेवढा वेळ जाणार आहे, तेवढा वेळ दुसरीकडे उपयोगात (करोडपती माणसांबद्दल बोलतोय) आणला तर अजून चार मोबाईल विकत घेण्याएवढे पैसे येतील, असा विचार ही श्रीमंत माणसे करतात. विचार करण्यासाठी तुमच्याकडे बँकेत भरपूर पैसा असण्याची आवश्यकता नाही. विचार करण्यासाठी काहीही लागत नाही. दिवसभरात ६० ते ७० हजार विचार डोक्यात येतच असतात. त्याला फक्त श्रीमंतीची दिशा द्यायची आहे. समजा तुम्हाला असे वाटते की, स्वतःचे एक विमान असावे. तर तुम्ही लगेच पुढचा विचार करताना आपल्याला ते परवडणार नाही, अशा पध्दतीने करत असाल, तर हा श्रीमंतीचा नसून गरीबीचा विचार आहे.

आता एक प्रश्न विचारतो. एक मोठे उद्योजक आयफोन वापरतात. त्यांचे उत्पन्न महिन्याला १५ ते २० लाखाच्या घरात आहे. ते आयफोन वापरतात हे पाहून त्यांच्या १२ हजार रुपये पगार असणाऱ्या ड्रायव्हरने हप्त्यावर ६० हजार रुपयांचा आयफोन (सगळ्यात लेटेस्ट व्हर्जन) घेतला. मग हे श्रीमंतीचे लक्षण आहे का गरीबीचे? तुमचे उत्तर आधी ठरवा. मगच पुढे वाचा.

तर वरील उदाहरणातील ड्रायव्हरने ६० हजार रुपयांचा आयफोन घेणे हे गरीबीचे लक्षण आहे. विचार श्रीमंतासारखा करणे म्हणजे आपल्या गरजा श्रीमंताएवढ्या करणे नव्हे. त्या ड्रायव्हरने आयफोन ही त्याची गरज आहे का? हा विचार करुन पाहायला पाहिजे होते. विनाकारण गरजा वाढवणे व त्या पूर्ण करत राहणे हे सुध्दा एक गरीबीचे लक्षण आहे. ६० हजाराचा आयफोन घेऊन त्याने त्याच्या ५ महिन्याच्या उत्पन्नाची गरज नसताना वाट लावली. त्या उद्योजकाला कदाचित Status symbol म्हणून आयफोन वापरावा लागत असेल, मात्र त्यासाठी त्याच्या कमाईचा किती भाग जातो. एका आयफोन साठी एका महिन्याच्या तीन ते चार टक्के उत्पन्न फक्त खर्च होते. तेच गणित ड्रायव्हरच्या बाबतीत लावले तर एका महिन्याच्या ५०० टक्के खर्च होतो. बऱ्याच वेळा श्रीमंतांच्या विचारांचे अनुकरुन करण्याऐवजी त्यांच्या कृतीचे अनुकरण केले जाते; हा फार मोठा आपणच आपल्यासाठी लावलेला सापळा असतो. त्यात आपण अलगद अडकतो. आपल्या आयुष्याचा कितीतरी वेळ त्यातून बाहेर पडण्यात जातो. विचारांचे अनुकरण करा. उद्या अजून काही मार्ग जाणून घेऊ या. धन्यवाद.

- अमोल चंद्रकांत कदम, संपादक, नवी अर्थक्रांती
#rich #money #पैसा #गरीब #श्रीमंत

No comments:

Post a Comment