Wednesday 29 November 2017

अर्थक्रांती भाग 5

पैसा वसे मनी…
भाग ०१ – पैसा गरज, अपेक्षा, वास्तव, समज व गैरसमज
------------------------------------------
०५. पैसे मिळवण्याची कला
------------------------------------------
पैसे मिळवणे ही कला आहे. त्याचबरोबर पैसे मिळवणे हे एक शास्त्र सुध्दा आहे. पैसा हा जगण्यासाठी लागणाऱ्या असंख्य गोष्टीची पूर्तता करण्यासाठी लागणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. पैशाविना जीवनाची कल्पना करुन पाहिल्यावर पैशाचे महत्त्व आपल्या लक्षात येईल. त्यामुळे पैसे मिळवण्याचे तंत्र शिकून घेणे प्रत्येकाला गरजेचे आहे. आता पैशाविषयी काही माहिती जाणून घेऊ या.

पैसा निर्माण करणे, श्रीमंत होणे, संपत्तीवान होणे, पैशांची गुंतवणूक करुन त्यातून अजून पैसा निर्माण करणे, संपत्ती निर्माणाचे अनेक प्रकार शोधणे या गोष्टींचा अंतर्भाव या विषयात होतो.

या अखंड विश्वात पैसे ही संकल्पना विकसित करणारा मानव हा एकमेव जीव आहे. बाकी प्रत्येक जीवाच्या मूलभूत गरजा या निसर्गातून पूर्ण होतात. माणसाला मात्र त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी व इतर गरजा पूर्ण करण्यासाठी सुध्दा पैशाची आवश्यकता आहे. अन्न, वस्त्र व निवारा, शिक्षण व आरोग्य या मुख्य गरजांसाठी पैसा लागतो. पैसा ही केवळ संकल्पना आहे, जी अनेक घटकांना एकत्र जोडते. काहीजणांचे शारीरिक कष्टांचे मूल्य पैशात ठरवले जाते. तर काहीजणांच्या बौध्दिक कामगिरीचे मूल्य पैशात ठरवले जाते. शेतातून पिकवलेल्या अन्नधान्याचे मूल्य, विविध संकल्पनांचे मूल्य, कलाकृतींचे मूल्य, यंत्रांचे व उपकरणांचे मूल्य या सारख्या प्रत्येक गोष्टीचे मूल्य पैशात मोजले जाते. त्याचे मूल्य वेगवेगळे असते. एकाच प्रकारच्या वेगवेगळ्या घटकांचे मूल्य त्याच्या दर्जानुसार, प्रमाणानुसार वेगवेगळे असू शकते.

बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी मिळत नाही किंवा व्यवसाय करताना अडचणी येतात. याची कारणे जाणून घेऊन त्यावरचे उपाय शोधून काढले तर प्रत्येकाला पैसा कसा मिळवायचा? याचे प्रभावी मार्ग माहिती होतील. पैसे कमावणे व त्याचे व्यवस्थापन दोन्ही महत्त्वाचे आहे. काहीजण अल्पमुदतीसाठी पैसे कमावतात. तर काहीजण दीर्घकालीन पैसा मिळण्याच्या तरतूदी करुन ठेवतात. एक माणूस दुसऱ्या माणसांकडून (वैयक्तिक व्यवहार), संस्था व्यक्तीकडून (नोकरी), व्यक्ती संस्थेकडून (सेवा अथवा उत्पादने) अथवा संस्था संस्थेकडून मिळणाऱ्या लाभाच्या बदल्यात पैसे मिळवले अथवा दिले जातात.

जिथे काम करतो तिथे गुणवत्तापूर्ण व नैतिक कामाच्या आधारावर काम केल्यास आपल्याला उत्तम पैसे मिळू शकतात. जगात लाखो पर्याय उपलब्ध असले तरी सुध्दा गुणवत्तापूर्ण पर्यायांची आवश्यकता सर्वकाळ असतेच. कंपनीला चांगले काम करणारे कर्मचारी मिळत नाही. घरगुती कामासाठी सेवा देणारे लोक व्यवस्थित मिळत नाहीत. चांगले उपचार करणारे डॉक्टर सगळीकडे आढळून येत नाहीत. उत्तम पध्दतीने शिकवणाऱ्या शिक्षकांची कमतरता सगळीकडे नेहमीच जाणवते. प्रवासाच्या सुविधा चांगल्या नसतात. चांगले राजकारणी, चांगले रस्ते, चांगल्या अन्न अशा अनेक गोष्टींची बाजारात नेहमी कमी असते. लोकांना या गोष्टीत गुणवत्ता हवी असते. त्यासाठी ते साठी ते योग्य पैसे द्यायला तयार असतात.

जे काही कराल त्यात गुणवत्तापूर्ण योगदान द्या. पैशाचा विचार न करता सुध्दा पैसे मिळतील. पैसे मिळवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. आपल्याला जे मिळते त्याच्या मोबदल्यात थोडेसे अधिक देण्याचा प्रयत्न केल्यास समृध्दीच्या सिंध्दातानुसार आपल्या जीवनात पैशाची वाढ होत राहिल. जे काही बनाल त्यात सर्वोच्च प्रतिभा सादर करा. पैसे मिळतील. आपल्याला ठरवण्याची (मग ती आपल्या उत्पादनांची असो, सेवांची असो की आपल्या कामाची असो) पात्रता बनवावी लागेल. मग पैसे मिळवणे अजून सोपे होते. शिकण्यासाठी सारे काही या लेखमालिकेतील सर्व कौशल्यांचा आपल्या जीवनात समावेश करत गेल्यास पैशाची अखंडता व समृध्दी आपल्याला प्राप्त होणारच. आतापर्यंत आपण या पुस्तकातून शिकलेल्या प्रत्येक गोष्टींचा आपल्या जीवनात वापर केल्यास आपल्याला कधीही बेरोजगार राहावे लागणार नाही. किंवा आपल्या जीवनात सतत उद्योगी राहण्याची प्रेरणा आपल्याला मिळेल. नोकरी करणार असल्यास नोकरीच्या अनेक संधी आपल्यासाठी वाट बघत राहतील. जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक मूल्यांची जोपासना जीवनात झाल्यास पैसा नावाचे फळ आपोआप लागते. नैतिक माणसाला पैसे मिळवण्याबरोबर सन्मान, पद, प्रतिष्ठा, प्रसिध्दी सुध्दा मिळते.

- अमोल चंद्रकांत कदम, संपादक, नवी अर्थक्रांती
#श्रीमंत #पैसा #मनी #money #शिक्षण #education #BePositive

No comments:

Post a Comment