Saturday 25 November 2017

अर्थक्रांती भाग 2

पैसा वसे मनी…
भाग ०१ – पैसा गरज, अपेक्षा, वास्तव, समज व गैरसमज
------------------------------------------
०२. पैशाची गरज व श्रीमंतीकडे वाटचाल
------------------------------------------
पैसा बहुत कुछ है लेकीन सबकुछ नही है,
बहुत कुछ पाने के लिए सबकुछ करना मत,
खरीददार चाहे कितना भी बडा क्यो न हो, बिकाऊ बनना मत,
दिमाग चाहे दिल न चाहे वह चीज करना मत |

ही उद्योगमहर्षी विठ्ठल कामत यांची अतिशय लाडकी चारोळी पैशाचे महत्त्व सांगून जाते. त्याचबरोबर पैशाबद्दल अजून एक अतिशय उत्तम असे वाक्य आहे. ते असे आहे,
पैसा खुदा तो नही, लेकिन खुदा से कम भी तो नही |

तुमच्याकडे कोणत्याही स्वरुपातले पैसेच नसतील तर...? अशी कल्पना करुन बघा. खिशात पैसे नाहीत. बँकेत पैसे नाहीत. घरात पैसे नाहीत. तुम्ही कुणाला उसने पैसे दिलेले नाहीत किंवा तुम्ही कुणाकडे उसने पैसे मागू सुध्दा शकत नाही. अशा प्रसंगी तुम्ही काय कराल? पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. घरात आहेत त्या जगण्यायोग्य वस्तूंचा साठा संपत चाललाय. एके दिवशी तो संपून गेला. आता काय करणार? पैशाविना जीवन म्हणजे जिवंतपणी मृत्यू अनुभवण्यासारखी अवस्था होय.

बऱ्याचवेळा पैशाबाबत अनेक गैरसमज पाळले जातात. पैसा हा आध्यात्मिक मार्गातील अडथळा आहे हा एक त्यातला मुख्य गैरसमज आहे. मात्र ज्यांनी संपूर्ण जगाला आपल्या आध्यात्माची ओळख करुन देऊन प्रभावीत केले ते विवेकानंद सांगतात की, उपाशीपोटी धर्म शिकवला जाऊ शकत नाही. त्यांनी पैशाचे महत्त्व नमूद केले आहे. पैसा आध्यात्मातील अडथळा आहे असे म्हणणाऱ्या लोकांच्या मनावर ताबा नसतो. त्यामुळे ते पैशाला बदनाम करतात. पैशाने अनेक चांगली कामे केली जाऊ शकतात. उत्तम शिक्षणासाठी शिक्षणसंस्था सुरु करण्यासाठी, चांगले रस्ते तयार करण्यासाठी, पुस्तके विकत घेण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी, चांगले व उबदार कपडे खरेदी करण्यासाठी, आपली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी, लोकांना सुखसोयी चांगल्या मिळवण्यासाठी, दवाखाने व आरोग्य केंद्रांसाठी, व्यायामशाळा उभारण्यासाठी, चांगली शेती पिकवण्यासाठी, संशोधनासाठी, खेळाडूंसाठी, मैदानांसाठी, सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी अगदी कशाचेही नाव घ्या. ती प्रत्येक गोष्ट साकारण्यासाठी पैसा लागतो. पैशाविना काहीच करता येत नाही.

मग आपल्याला बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की, जे लोक पैशाने अमुक गोष्टी खरेदी करता येतील मात्र तमुक गोष्ट खरेदी करता येणार नाहीत याची मोठी यादी सांगत असतात त्यांचे काय? उदाहरण द्यायचे झाल्यास पैशाने पुस्तके खरेदी करता येतील ज्ञान नाही. पैशाने चांगले अंथरुन खरेदी करता येईल, झोप नाही. अशा वाक्यांचा भडीमार करणाऱ्या व्यक्तींनी हे समजून घेणे गरजेचे आहे की, पुस्तके खरेदी करणे ही पैशाने साध्य होणारी कृती आहे ते पैशाचे काम आहे. ती पुस्तके वाचणे हे तुमचे काम आहे, पैशाचे नाही. त्यासाठी पैशाला कशाला दोष देता? तो दोष तुमचा आहे. अंथरुन विकत घेणे ही पैशाने साध्य होणारी कृती आहे. झोप लागणे न लागणे ही तुमच्या कर्मावर किंवा मानसिक शांतीवर अवलंबवून आहे. पैशावर नाही.

पैशाने माणूस बिघडतो वगैरे या गोष्टीत काहीही तथ्य नाही. तसे असते तर सगळी गरीब माणसे चांगली असती किंवा सगळी श्रीमंत माणसे वाईट असली असती. ज्याची वृत्ती वाईट आहे ती माणसे वाईट वागणार. मग त्यांच्याकडे पैसे आहेत किंवा नाहीत याने काही फरक पडत नाही. ज्यांची वृत्ती विधायक आहे ती माणसे चांगलीच वागणार. तो संस्काराचा भाग आहे. त्यांच्याकडे पैसा असला किंवा नसला तरी काही फरक पडत नाही. काहीवेळा पैशामुळे आपापली वृत्ती प्रकट करायला वाव मिळतो. चांगल्या माणसांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आला तर त्या समाजाची भरभराट होते. कारण चांगली माणसे पैसा आल्यावर शिक्षणसंस्था, दवाखाने, चांगले रस्ते, संस्कार केंद्रे अशा विधायक गोष्टी सुरु करतील. याउलट वाईट माणसांकडे पैसा आला तर त्या समाजाची अधोगती होते. कारण विध्वंसक माणसे जुगार, दारुचे अड्डे सुरु करतील.

म्हणून पैशाचा संबंध चांगल्या वाईट कामाशी जोडू नये. पैसा प्रत्येकाला हवा आहे. तो कसा मिळवायचा? कसा वाढवायचा? याचा अभ्यास करु या. श्रीमंतीकडे वाटचाल झालीच पाहिजे. धन्यवाद.

- अमोल चंद्रकांत कदम, संपादक, नवी अर्थक्रांती.
#rich #money #पैसा #गरीब #श्रीमंत #पैसा
-------------------------------------------
सुविचार, आर्थिक, सामाजिक, स्टार्टअप, उद्योग, शेती या विषयांवरील उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी लाईक करा 'नवी अर्थक्रांती'
क्लिक करा : https://goo.gl/Qmjbq7

No comments:

Post a Comment