Wednesday 29 November 2017

अर्थक्रांती भाग 7

पैसा वसे मनी…
भाग ०१ – पैसा गरज, अपेक्षा, वास्तव, समज व गैरसमज
------------------------------------------
०७. गरीबीतून वर उठण्याचे मार्ग
------------------------------------------
गरीबीची वृत्ती हा एक रोग आहे. गरीब व्यक्ती हा त्या रोगाने पछाडलेला रुग्ण आहे. काहीजणांवर तर या रोगाचा एवढा प्रभाव आहे की, हा रोग त्यांचा जीवसुध्दा घेऊ शकतो. शेतकरी आत्महत्या किंवा कर्जबाजारी झाल्याने जीवन त्यागणे, ही गरीबीचा रोग सर्वोच्च पातळीला पोहोचलेल्या लोकांची अवस्था आहे. हा रोग अतिशय घातक आहे, मात्र हा रोग बरा केला जाऊ शकतो. त्यामुळे या रोगाचा कोणत्याही थराला पोहोचलेला रुग्ण खडखडीत बरा होऊ शकतो. प्रसिध्द उद्योजक व फोर्ड कारची निर्मिती करणारे हेन्री फोर्ड यांना हा रोग आयुष्यात सात वेळा झाला होता. ते त्यांच्या आयुष्यात सात वेळा दिवाळखोरीत निघाले होते, मात्र त्यांच्या वृत्तीत श्रीमंतीची लक्षणे असल्यामुळे ते लवकर बरे झाले. त्यांनी खूप मोठी कामे सुध्दा केली.

एखादा रोग शरीरातून घालवायचा असेल तर त्याच्यावर प्रेम करुन कसे चालेल? म्हणून गरीबीवर प्रेम करणे सोडून दिले पाहिजे. जे गरीब आहेत त्यांनी विचार श्रीमंतासारखे करायला पाहिजेत. स्वतःला गरीब समजणे सोडून दिले पाहिजे. समजा तुमचा मोबाईल हरवला तर तुम्ही काय करता? मोठ्या प्रमाणात पश्चाताप करता. शोधण्याचा प्रयत्न करता. मनाला फार वाईट वाटून घेता. परत तसाच मोबाईल घ्यायचा तर अवघड गोष्ट आहे असा विचार करता. मोबाईल हरवल्याचे दुःख मनातून काही केल्या जात नाही. थोडावेळ वेगळा विचार करुन पहा. म्हणजे तुम्ही करोडपती असता तर तुम्हाला मोबाईल हरवल्याचे आता जेवढे दुःख झाले आहे तेवढे दुःख झाले असते का? तर अजिबात झाले नसते. मग शोधायचा प्रयत्न करणे चुकीचे आहे का? तर मोबाईल शोधायचा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही, मात्र पश्चाताप करुन किंवा दुःख व्यक्त करुन तो परत मिळत नाही. म्हणून विचार श्रीमंतासारखा केला पाहिजे, त्यामुळे दुःख अथवा पश्चाताप होत नाही. श्रीमंत माणसेसुध्दा मोबाईल हरवल्यावर शोधायचा प्रयत्न करतातच की! त्यांचा महत्त्वाचा data त्या मोबाईल मध्ये असतो. त्यांना तो हवा असतो. मात्र दुःख करण्यात जेवढा वेळ जाणार आहे, तेवढा वेळ दुसरीकडे उपयोगात (करोडपती माणसांबद्दल बोलतोय) आणला तर अजून चार मोबाईल विकत घेण्याएवढे पैसे येतील, असा विचार ही श्रीमंत माणसे करतात. विचार करण्यासाठी तुमच्याकडे बँकेत भरपूर पैसा असण्याची आवश्यकता नाही. विचार करण्यासाठी काहीही लागत नाही. दिवसभरात ६० ते ७० हजार विचार डोक्यात येतच असतात. त्याला फक्त श्रीमंतीची दिशा द्यायची आहे. समजा तुम्हाला असे वाटते की, स्वतःचे एक विमान असावे. तर तुम्ही लगेच पुढचा विचार करताना आपल्याला ते परवडणार नाही, अशा पध्दतीने करत असाल, तर हा श्रीमंतीचा नसून गरीबीचा विचार आहे.

आता एक प्रश्न विचारतो. एक मोठे उद्योजक आयफोन वापरतात. त्यांचे उत्पन्न महिन्याला १५ ते २० लाखाच्या घरात आहे. ते आयफोन वापरतात हे पाहून त्यांच्या १२ हजार रुपये पगार असणाऱ्या ड्रायव्हरने हप्त्यावर ६० हजार रुपयांचा आयफोन (सगळ्यात लेटेस्ट व्हर्जन) घेतला. मग हे श्रीमंतीचे लक्षण आहे का गरीबीचे? तुमचे उत्तर आधी ठरवा. मगच पुढे वाचा.

तर वरील उदाहरणातील ड्रायव्हरने ६० हजार रुपयांचा आयफोन घेणे हे गरीबीचे लक्षण आहे. विचार श्रीमंतासारखा करणे म्हणजे आपल्या गरजा श्रीमंताएवढ्या करणे नव्हे. त्या ड्रायव्हरने आयफोन ही त्याची गरज आहे का? हा विचार करुन पाहायला पाहिजे होते. विनाकारण गरजा वाढवणे व त्या पूर्ण करत राहणे हे सुध्दा एक गरीबीचे लक्षण आहे. ६० हजाराचा आयफोन घेऊन त्याने त्याच्या ५ महिन्याच्या उत्पन्नाची गरज नसताना वाट लावली. त्या उद्योजकाला कदाचित Status symbol म्हणून आयफोन वापरावा लागत असेल, मात्र त्यासाठी त्याच्या कमाईचा किती भाग जातो. एका आयफोन साठी एका महिन्याच्या तीन ते चार टक्के उत्पन्न फक्त खर्च होते. तेच गणित ड्रायव्हरच्या बाबतीत लावले तर एका महिन्याच्या ५०० टक्के खर्च होतो. बऱ्याच वेळा श्रीमंतांच्या विचारांचे अनुकरुन करण्याऐवजी त्यांच्या कृतीचे अनुकरण केले जाते; हा फार मोठा आपणच आपल्यासाठी लावलेला सापळा असतो. त्यात आपण अलगद अडकतो. आपल्या आयुष्याचा कितीतरी वेळ त्यातून बाहेर पडण्यात जातो. विचारांचे अनुकरण करा. उद्या अजून काही मार्ग जाणून घेऊ या. धन्यवाद.

- अमोल चंद्रकांत कदम, संपादक, नवी अर्थक्रांती
#rich #money #पैसा #गरीब #श्रीमंत

अर्थक्रांती भाग 5

पैसा वसे मनी…
भाग ०१ – पैसा गरज, अपेक्षा, वास्तव, समज व गैरसमज
------------------------------------------
०५. पैसे मिळवण्याची कला
------------------------------------------
पैसे मिळवणे ही कला आहे. त्याचबरोबर पैसे मिळवणे हे एक शास्त्र सुध्दा आहे. पैसा हा जगण्यासाठी लागणाऱ्या असंख्य गोष्टीची पूर्तता करण्यासाठी लागणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. पैशाविना जीवनाची कल्पना करुन पाहिल्यावर पैशाचे महत्त्व आपल्या लक्षात येईल. त्यामुळे पैसे मिळवण्याचे तंत्र शिकून घेणे प्रत्येकाला गरजेचे आहे. आता पैशाविषयी काही माहिती जाणून घेऊ या.

पैसा निर्माण करणे, श्रीमंत होणे, संपत्तीवान होणे, पैशांची गुंतवणूक करुन त्यातून अजून पैसा निर्माण करणे, संपत्ती निर्माणाचे अनेक प्रकार शोधणे या गोष्टींचा अंतर्भाव या विषयात होतो.

या अखंड विश्वात पैसे ही संकल्पना विकसित करणारा मानव हा एकमेव जीव आहे. बाकी प्रत्येक जीवाच्या मूलभूत गरजा या निसर्गातून पूर्ण होतात. माणसाला मात्र त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी व इतर गरजा पूर्ण करण्यासाठी सुध्दा पैशाची आवश्यकता आहे. अन्न, वस्त्र व निवारा, शिक्षण व आरोग्य या मुख्य गरजांसाठी पैसा लागतो. पैसा ही केवळ संकल्पना आहे, जी अनेक घटकांना एकत्र जोडते. काहीजणांचे शारीरिक कष्टांचे मूल्य पैशात ठरवले जाते. तर काहीजणांच्या बौध्दिक कामगिरीचे मूल्य पैशात ठरवले जाते. शेतातून पिकवलेल्या अन्नधान्याचे मूल्य, विविध संकल्पनांचे मूल्य, कलाकृतींचे मूल्य, यंत्रांचे व उपकरणांचे मूल्य या सारख्या प्रत्येक गोष्टीचे मूल्य पैशात मोजले जाते. त्याचे मूल्य वेगवेगळे असते. एकाच प्रकारच्या वेगवेगळ्या घटकांचे मूल्य त्याच्या दर्जानुसार, प्रमाणानुसार वेगवेगळे असू शकते.

बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी मिळत नाही किंवा व्यवसाय करताना अडचणी येतात. याची कारणे जाणून घेऊन त्यावरचे उपाय शोधून काढले तर प्रत्येकाला पैसा कसा मिळवायचा? याचे प्रभावी मार्ग माहिती होतील. पैसे कमावणे व त्याचे व्यवस्थापन दोन्ही महत्त्वाचे आहे. काहीजण अल्पमुदतीसाठी पैसे कमावतात. तर काहीजण दीर्घकालीन पैसा मिळण्याच्या तरतूदी करुन ठेवतात. एक माणूस दुसऱ्या माणसांकडून (वैयक्तिक व्यवहार), संस्था व्यक्तीकडून (नोकरी), व्यक्ती संस्थेकडून (सेवा अथवा उत्पादने) अथवा संस्था संस्थेकडून मिळणाऱ्या लाभाच्या बदल्यात पैसे मिळवले अथवा दिले जातात.

जिथे काम करतो तिथे गुणवत्तापूर्ण व नैतिक कामाच्या आधारावर काम केल्यास आपल्याला उत्तम पैसे मिळू शकतात. जगात लाखो पर्याय उपलब्ध असले तरी सुध्दा गुणवत्तापूर्ण पर्यायांची आवश्यकता सर्वकाळ असतेच. कंपनीला चांगले काम करणारे कर्मचारी मिळत नाही. घरगुती कामासाठी सेवा देणारे लोक व्यवस्थित मिळत नाहीत. चांगले उपचार करणारे डॉक्टर सगळीकडे आढळून येत नाहीत. उत्तम पध्दतीने शिकवणाऱ्या शिक्षकांची कमतरता सगळीकडे नेहमीच जाणवते. प्रवासाच्या सुविधा चांगल्या नसतात. चांगले राजकारणी, चांगले रस्ते, चांगल्या अन्न अशा अनेक गोष्टींची बाजारात नेहमी कमी असते. लोकांना या गोष्टीत गुणवत्ता हवी असते. त्यासाठी ते साठी ते योग्य पैसे द्यायला तयार असतात.

जे काही कराल त्यात गुणवत्तापूर्ण योगदान द्या. पैशाचा विचार न करता सुध्दा पैसे मिळतील. पैसे मिळवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. आपल्याला जे मिळते त्याच्या मोबदल्यात थोडेसे अधिक देण्याचा प्रयत्न केल्यास समृध्दीच्या सिंध्दातानुसार आपल्या जीवनात पैशाची वाढ होत राहिल. जे काही बनाल त्यात सर्वोच्च प्रतिभा सादर करा. पैसे मिळतील. आपल्याला ठरवण्याची (मग ती आपल्या उत्पादनांची असो, सेवांची असो की आपल्या कामाची असो) पात्रता बनवावी लागेल. मग पैसे मिळवणे अजून सोपे होते. शिकण्यासाठी सारे काही या लेखमालिकेतील सर्व कौशल्यांचा आपल्या जीवनात समावेश करत गेल्यास पैशाची अखंडता व समृध्दी आपल्याला प्राप्त होणारच. आतापर्यंत आपण या पुस्तकातून शिकलेल्या प्रत्येक गोष्टींचा आपल्या जीवनात वापर केल्यास आपल्याला कधीही बेरोजगार राहावे लागणार नाही. किंवा आपल्या जीवनात सतत उद्योगी राहण्याची प्रेरणा आपल्याला मिळेल. नोकरी करणार असल्यास नोकरीच्या अनेक संधी आपल्यासाठी वाट बघत राहतील. जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक मूल्यांची जोपासना जीवनात झाल्यास पैसा नावाचे फळ आपोआप लागते. नैतिक माणसाला पैसे मिळवण्याबरोबर सन्मान, पद, प्रतिष्ठा, प्रसिध्दी सुध्दा मिळते.

- अमोल चंद्रकांत कदम, संपादक, नवी अर्थक्रांती
#श्रीमंत #पैसा #मनी #money #शिक्षण #education #BePositive

अर्थक्रांती भाग 6

पैसा वसे मनी…
भाग ०१ – पैसा गरज, अपेक्षा, वास्तव, समज व गैरसमज
------------------------------------------
०६. गरीबीची लक्षणे
------------------------------------------
‘तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, मात्र गरीबीतच मेलात तर तो मात्र तुमचाच दोष आहे’, बिल गेट्स यांचे हे वाक्य स्वतःला गरीब समजणाऱ्या माणसाच्या मनावर परिणाम करत नसेल तर मोठी अडचण आहे. गरीब माणसांची लक्षणे कोणती व गरीबीची लक्षणे कोणती? आता आपल्याला हा प्रश्न पडू शकेल की, गरीब व गरीबी या दोन्ही वेगळ्या संकल्पना आहेत का? तर निश्चितच त्या दोन्ही वेगळ्या संकल्पना आहेत. गरीब ही व्यक्ती आहे, तर गरीबी ही वृत्ती आहे. मी वैयक्तिकरित्या एक सांगतो, की मला गरीबीबद्दल कोणतीही आस्था नाही किंवा प्रेम नाही, मात्र गरीबाबद्दल कळवळा जरुर आहे. मी गरीबीचा रागराग करतो. गरीबाचा नाही. गरीब माणूस श्रीमंत होऊ शकतो, मात्र गरीबीची वृत्ती सोडायला तयार नसलेल्या माणसांचे भवितव्य कुणीच बदलू शकत नाही.

गरीबाची लक्षणे प्रथम जाणून घेऊ या. खायला अन्न नाही, चांगली कपडे घालायला नाहीत, मुलांना चांगले शिक्षण देण्याइतपत पैसे नाहीत, म्हातारपणात रिटायरमेंट साठी कोणतीही तरतूद केलेली नाही, राहायला साधारण दर्जाचे घरसुध्दा नाही किंवा आजारी पडला तर विश्रांती घेऊ शकत नाही, दवाखान्यात जाऊन उपचार घेता येत नाहीत, बँक खात्यात किमान रक्कम राखता येत नाही म्हणून वारंवार दंडसुध्दा भरावा लागतो, कितीतरी गरजा पुढे ढकलाव्या लागतात किंवा कधीच पूर्ण होत नाहीत. (इथे गरजा हा शब्द वापरला आहे. हव्यास नाही). सर्वात महत्त्वाचे, केवळ पैसे नाहीत म्हणून जीवनातला आनंद उडून गेलेला आहे, ही सगळी गरीबाची लक्षणे आहेत. वर उल्लेख केलेल्या वस्तू किंवा सुविधा प्रत्येक माणसाला मिळवता आल्या पाहिजेत. त्या मिळवता येत नसतील तर तो माणूस सध्याच्या स्थितीला गरीब आहे. ही स्थिती बदलली जाऊ शकते. गरीब माणूस श्रीमंत होऊ शकतो.

आता गरीबीची लक्षणे जाणून घेऊ या. आपण गरीब असल्याचा प्रंचड अभिमान बाळगणे, श्रीमंताचा द्वेष करणे, पैशाला वाईट म्हणणे, पैशाने माणूस बिघडतो असे सांगणे, पैशाची बदनामी करणे, काही वाईट घडले की त्याचा संबंध पैशाशी जोडणे, कष्ट करुन श्रीमंत होता येत नाही किंवा मोठ्या प्रमाणावर पैसा कमावता येत नाही असे समजणे, कष्ट करुन मिळवलेलाच पैसा खरा पैसा आहे बाकी सगळा दोन नंबरचा पैसा आहे असे समजणे, कुणीही मोठा झाला (अर्थात श्रीमंत झाला) तर तो सरळ मार्गाने पैसे कमावून मोठा झाला नाही याचा प्रचार करणे, एखाद्या व्यक्तीच्या यशाला चमत्कार म्हणणे, एखादी गोष्ट केवळ मीच करु शकतो आणि इतर कुणी केली तर ती चूक आहे असे समजणे, श्रीमंताच्या घरात जन्माला आले, तरच श्रीमंत होता येते किंवा हुशार मुले पोटी जन्माला आली तरच श्रीमंत होता येते असे वाटणे, श्रीमंत झालेला प्रत्येक माणूस हा कुणालातरी लुबाडून श्रीमंत झाला आहे असे समजणे, प्रत्येक मोठ्या कामामागे एक गुन्हा लपलेला असतो असे समजणे, प्रत्येक सरकारी अधिकारी किंवा राजकारणी भ्रष्टाचार करणारेच आहेत अशी पक्की धारणा असणे, जगात सगळी माणसे लुटण्या-लुबाडण्यासाठीच आहेत असे वारंवार वाटणे, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण या जन्मात काय कोणत्याच जन्मात श्रीमंत होणार नाही, अशी अनेक लक्षणे आहेत. अजून एक, गरीबीतली भाजीभाकरी बरी, पण श्रीमंताची चाकरी नको असे मानणे हे सुध्दा गरीबीचे लक्षण आहे. गरीबाकडे तुम्ही येणार नाही किंवा आम्ही गरीब, तुम्ही श्रीमंत असे वारंवार बोलत राहणे, गरीबीचा उदोउदो करणे किंवा श्रीमंतीला शिव्या घालणे ही सुध्दा नेहमी आढळून येणारी गरीबीची लक्षणे आहेत.

गरीब माणसाची सगळीच्या सगळी लक्षणे असली तरी काही अडचण नाही, मात्र गरीबीची किती लक्षणे आपल्याकडे सध्या आहेत? याचा शोध घेतला पाहिजे, आत्मपरिक्षण केले पाहिजे. ती लक्षणे दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच आपल्याला गरीबीतून वर उठता येईल व समृध्दीच्या मार्गावर वाटचाल करता येईल. गरीबीतून वर उठण्याचे मार्ग उद्याच्या लेखात जाणून घेऊ धन्यवाद.

- अमोल चंद्रकांत कदम, संपादक, नवी अर्थक्रांती
#rich #money #पैसा #गरीब #श्रीमंत

Sunday 26 November 2017

अर्थक्रांती भाग4

पैसा वसे मनी…
भाग ०१ – पैसा गरज, अपेक्षा, वास्तव, समज व गैरसमज
------------------------------------------
०४. पैसा – समज व गैरसमज
------------------------------------------
पैसा मिळवणे ही सुध्दा एक कला आहे. ती कला साध्य करण्याआधी पैशाविषयी असणाऱ्या मानसिकता, समज – गैरसमज याबद्दल जाणून घेऊ या. नंतर पैसा मिळवण्याचे तंत्र जाणून घेऊ. त्यानंतर पैसा वाढवण्याचे तंत्र जाणून घेऊ या.

पैसा मिळवणे हा शिक्षणाचा उद्देश नसला तरीसुध्दा सुयोग्य शिक्षणातून पैसा मिळाला पाहिजे. जीवनातल्या अनेक गरजा या पैशातून भागवल्या जातात. त्यामुळे पैसा मिळवण्याचे तंत्र हे प्रत्येकाला जमले पाहिजे. बऱ्याच वेळा पैशाविषयी नकारात्मक मानसिकता जोपासल्या जातात किंवा काही वेळा पैशाला नको तेवढे महत्त्व दिले जाते. या दोन्ही टोकाच्या भूमिका सोडून देऊन पैशाचे योग्य महत्त्व जाणून घेतले पाहिजे. तेवढे पैसे कमावले पाहिजेत. अति पैसा आल्यावर माणूस बिघडतो अशा प्रकारे पैशांचा संबंध माणसाच्या चांगुलपणाशी व वाईटपणाशी जोडला जातो. ते ही बरोबर नाही. चांगल्या माणसाने प्रचंड प्रमाणात पैसा कमावला तर तो विधायक (चांगल्या) कामासाठी वापरला जातो. वाईट माणसाने प्रचंड प्रमाणात पैसा कमावला तर तो विध्वंसक कामासाठी वापरला जाईल. त्यामुळे समाजात चांगल्या प्रवृत्तीच्या माणसांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आला पाहिजे. तुम्हाला जर आदर्श निर्माण करायचे असतील. तर पैशाशी फारकत घेऊ नका. विपुल प्रमाणात पैसा कमवा व चांगल्या कार्यात त्यांची गुंतवणूक करा.

आपण नेहमी बोलताना ‘कधीतरी गरीबाकडे येऊन जा’ असे म्हणतो. अशा प्रकारची वाक्ये बोलायची सवय लागली असेल तर कळत नकळत आपली पैशाविषयी नकारात्मक मानसिकता निर्माण झाली आहे असे समजावे. इथून पुढे बोलताना पैशाविषयी जाणीवपूर्वक सकारात्मक बोलायला सूरवात करा. गरीबी कुणालाच नको असते. तरी तिचाच उदो उदो का केला जातो हे कळत नाही? स्वतःला श्रीमंत म्हटले तर काही फरक पडेल का? म्हणजे याचा अर्थ समोरच्याला गरीब म्हणू नका. त्यालाही श्रीमंत म्हणा. पूर्वी राजे महाराजांच्या काळात एकमेकांना हाक मारताना श्रीमंत म्हणून बोलावले जाई. तो एक पैशाविषयी सकारात्मक मानसिकतेचा प्रभाव होता. अशा प्रकारे लक्षपूर्वक आपल्या बोलण्यातल्या पैशाविषयी असलेल्या नकारात्मकता शोधून काढून त्या दूर केल्या पाहिजे. बऱ्याच वेळा ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत त्या माणसातले दोष मोजले जातात, मात्र प्रत्येक व्यक्तीत दोष असतात. ते दोष पैसा आल्यामुळे किंवा न आल्यामुळे बदलत नाहीत. चांगली माणसे पैसा आल्यावरही चांगलीच वागतात.

बऱ्याच वेळा पैशाची तुलना देवाशी केली जाते, मात्र त्यात सुध्दा फारसे काही तथ्य नाही. आपण प्रत्येक गोष्टीचा संबंध पैशाशी जोडतो तिथे गफलत होत असते. देव (आस्तिक लोकांसाठी) हा देवाच्या ठिकाणी आहे, पैसा हा पैशाच्या ठिकाणी आहे. आपल्या हक्काचा पैसा मागताना आपल्याला संकोच वाटत असेल तर ही सुध्दा पैशाबाबतची नकारात्मक भूमिकाच आहे. पैसा हातचा मळ आहे असे समजून पैसा बेफिकीरीने वापरणे हा सुध्दा एक प्रकारचा पैसे व्यवस्थापनातला दोषच आहे. त्याशिवाय काटकसरीच्या नावाखाली जीवनातील महत्त्वपूर्ण गरजा दाबून टाकणे हा पैशाचा अपमान आहे. दिवाळीला आपण लक्ष्मीपूजन करतो. हा पैशाविषयीचा एक चांगला संस्कार आहे. लक्ष्मीची व सरस्वतीची तुलना बऱ्याच वेळा केली जाते. ही तुलना करुच नये. शिक्षण हे महत्त्वाचे आहे तेवढाच पैसा पण महत्त्वाचा आहे. एखाद्याला हात महत्त्वाचे की डोळे महत्त्वाचे? असा प्रश्न विचारण्यासारखे हे होईल. बचत करणे व गुंतवणूक करणे हे सुध्दा पैशाबाबतचे चांगले संस्कार आहेत. ठराविक प्रमाणात योग्य ठिकाणी (शक्यतो विधायक कार्यासाठी) पैसा दान करणे हा सुध्दा पैशाबाबतचा अजून एक चांगला संस्कार आहे.

बऱ्याच वेळा पैशाने काय मिळते व काय मिळत नाही याचे तक्ते विकत घेऊन घरात लावले जातात. पैशाने चांगला बिछाना विकत घेऊ शकतो झोप नाही. पैशाने पुस्तके विकत घेता येतात शहाणपण नाही. अशा प्रकारची वाक्ये त्या तक्त्यावर लिहलेली असतात. हे ही चूकच आहे. पाण्याने तहान भागवली जाते. श्वासामुळे प्राणावायूची गरज भागवली जाते. यात अदलाबदल शक्य नाही. पाण्यातून प्राणवायू घेता येणार नाही किंवा श्वास घेतल्यामुळे तहान भागवली जाणार नाही. त्याचप्रमाणे बिछाना विकत घेणे व पुस्तके विकत घेणे ही पैशाने होणारी कामे आहेत. झोप लागणे व शहाणपण येणे ही पैशाच्या कार्याक्षेत्राबाहेरील प्रक्रिया आहे. त्यात पैशाचा काहीच दोष नाही. त्यामुळे अशा गोष्टींचा पैशांशी संबंध जोडू नये. व्यक्तिमत्वाच्या इतर पैलूंसोबत पैशाची तुलना करु नये. अशा प्रकारे पैशाविषयी आपली समज समृध्द करु या. धन्यवाद.
मग काय म्हणता? श्रीमंत वाचकहो, पटलं की नाही?

- अमोल चंद्रकांत कदम, संपादक, नवी अर्थक्रांती.
#rich #money #पैसा #गरीब #श्रीमंत

अर्थक्रांती भाग 3

पैसा वसे मनी…
भाग ०१ – पैसा गरज, अपेक्षा, वास्तव, समज व गैरसमज
------------------------------------------
०३. पैसा – अपेक्षा व वास्तव
------------------------------------------
यशस्वी होण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते, मात्र यशासाठी लागणारी किंमत चुकवायची तयारी फारच थोडे लोक दाखवतात. जे लोक यशासाठी लागणारी किंमत चुकवतात, तेच लोक यशस्वी होतात. आपल्याकडे भरपूर पैसा असावा असे प्रत्येकाला वाटते, मात्र अनेक लोकांना भरपूर प्रमाणात पैसा मिळत नाही, त्यामुळे त्यांचे जगणे अवघड होऊन जाते.

पैसा ही संकल्पना आहे. वेगवेगळ्या काळात तिची रुपे बदलत गेली आहेत. महाभारताच्या काळात गोधन म्हणजे संपत्ती होती. ज्या राजाकडे सर्वात जास्त गाई असत तो राजा श्रीमंत समजला जायचा. अश्मयुगात ज्याच्याकडे भाला किंवा तत्सम शस्त्रे असणारा माणूस संपत्तीवान मानला जायचा. मधल्या काही दशकात समुद्रातले विशिष्ट प्रकारचे शिंपले ज्याच्याकडे असत तो श्रीमंत ठरत असे, त्याला कवड्या म्हणत. गेल्या काही दशकात ज्याच्याकडे रोकड रक्कम जी नोटांच्या स्वरुपात असे ती जास्त असेल तो श्रीमंत ठरत असे. आज ज्याच्याकडे डिजीटल माध्यमातील पैसा आहे. तो माणूस श्रीमंत आहे. स्मार्ट आहे. येणाऱ्या काळात त्याची जागा कदाचित क्रिप्टो करंसी घेईल. काळानुरुप पैसा ही संकल्पना बदलत जाते. त्याची नावेसुध्दा बदलत जातात.

आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी करताना पैशाची चणचण भासू नये, एवढे पैसे प्रत्येकाने कमावले पाहिजेत. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, प्रत्येकाने किती पैसा कमावला पाहिजे? याचे काही ठोस उत्तर नाही; कारण प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या अपेक्षा वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाच्या जगण्याच्या पध्दतीत फरक आहे. जीवनशैलीत फरक आहे. त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या पैसा प्रमाणात लागत असतो.

तारुण्यात आयुष्य मोठ्या प्रमाणात व भरभरुन जगले पाहिजे. मौजमस्ती किंवा इतर गोष्टींचा आनंद घेतला पाहिजे. तारुण्यातली सगळीच्या सगळे उमेदीची वर्षे केवळ पैसा गोळा करण्यात वाया घालवली, तर म्हातारपणी तो मिळवलेला पैसा उपभोगण्याची क्षमता उरेलच असे नाही. तारुण्याची बहारदार वर्षे सदाबहार जगण्यात जी मजा आहे त्याचा आनंद घेतला पाहिजे. आनंदाने जगण्याच्या संकल्पना म्हणजे मोठी साहसे करणे, जनमानसात आपल्या कर्तृत्वावाचा ठसा उमटवणे, यशाच्या शिखरावर जाणे, पर्यटनाचा आनंद लुटणे या गोष्टी आहेत. आरोग्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टी, चारित्र्याची बदनामी करणाऱ्या गोष्टी मिळवणे म्हणजे सदाबहार जगणे नव्हे हे लक्षात घेतले पाहिजे. या सगळ्या गोष्टी पैशाने साध्य होतात. पैशाबद्दल या किमान अपेक्षा प्रत्येकाच्या असतात; याहून मोठ्या सुध्दा अपेक्षा असाव्यात.

पैशाबद्दल अपेक्षा कितीही असू शकतात, मात्र प्रत्यक्ष हातात येणारा पैसा आपल्या अपेक्षेएवढा असतोच असे नाही. कमावलेल्या पैशाचे योग्य नियोजन करुन आपल्याला आपल्या अपेक्षा पूर्ण करता येतात. कमी पडत असलेले पैसे उभारणीचे तंत्र अवगत करुन घ्यायला पाहिजे. पैसे उभारताना ज्यांनी मदत केली त्यांचे पैसे वेळेवर परत करण्याची कला आपल्याला साध्य झाली पाहिजे. तरच अपेक्षेइतके पैसे मिळवता येतील. स्वप्न व सत्य यात अंतर राहणार नाही. प्रत्येक वस्तू खरेदी करताना आपली गरज आहे का? आपण तिचा वापर करणारा आहोत का? उपभोग घेणार आहोत का? या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे आली तरच खरेदी करा. अन्यथा नको तिथे तो पैसा अडकून पडतो. आपण आयुष्यात अशा कितीतरी वस्तू व सेवा खरेदी केलेल्या असतात, त्याचा वापर आपण कधीच केलेला नसतो. कधीही न घातलेले कपड्याचे किती जोड कपाटात आहेत? त्यावर नजर टाका. नसतील तर उत्तम आहे, मात्र असतील तर थोडासा विचार करण्याची गरज आहे. फक्त कपडेच नाही तर इतर अजून गोष्टींचा विचार करा, ज्यांचा वापर केलेला नाही.

माणसाच्या गरजा त्याच्या उत्पन्नानुसार वाढत नाहीत. पाच हजार उत्पन्न असताना जेवढे अन्न लागत होते तेवढेच अन्न पन्नास हजार उत्पन्न झाल्यावर सुध्दा लागणार आहे. पाच हजाराचे उत्पन्न पन्नास हजार झाल्यावर दहापट खाणारा माणूस आजपर्यंत माझ्या निदर्शनास आलेला नाही. आरामदायी वस्तूंच्या खरेदीच्या प्रमाणात वाढ होते, मात्र त्या वस्तू खरेदी करताना सुध्दा त्याचा वापर करणार आहोत का? आपल्याला त्याची गरज आहे का? त्या उपभोग घेण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे का? या तीन प्रश्नांची उत्तरे सकारात्मक आली तरच खरेदी करा. धन्यवाद.

- अमोल चंद्रकांत कदम, संपादक, नवी अर्थक्रांती.
#rich #money #पैसा #गरीब #श्रीमंत