Wednesday 29 November 2017

अर्थक्रांती भाग 6

पैसा वसे मनी…
भाग ०१ – पैसा गरज, अपेक्षा, वास्तव, समज व गैरसमज
------------------------------------------
०६. गरीबीची लक्षणे
------------------------------------------
‘तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, मात्र गरीबीतच मेलात तर तो मात्र तुमचाच दोष आहे’, बिल गेट्स यांचे हे वाक्य स्वतःला गरीब समजणाऱ्या माणसाच्या मनावर परिणाम करत नसेल तर मोठी अडचण आहे. गरीब माणसांची लक्षणे कोणती व गरीबीची लक्षणे कोणती? आता आपल्याला हा प्रश्न पडू शकेल की, गरीब व गरीबी या दोन्ही वेगळ्या संकल्पना आहेत का? तर निश्चितच त्या दोन्ही वेगळ्या संकल्पना आहेत. गरीब ही व्यक्ती आहे, तर गरीबी ही वृत्ती आहे. मी वैयक्तिकरित्या एक सांगतो, की मला गरीबीबद्दल कोणतीही आस्था नाही किंवा प्रेम नाही, मात्र गरीबाबद्दल कळवळा जरुर आहे. मी गरीबीचा रागराग करतो. गरीबाचा नाही. गरीब माणूस श्रीमंत होऊ शकतो, मात्र गरीबीची वृत्ती सोडायला तयार नसलेल्या माणसांचे भवितव्य कुणीच बदलू शकत नाही.

गरीबाची लक्षणे प्रथम जाणून घेऊ या. खायला अन्न नाही, चांगली कपडे घालायला नाहीत, मुलांना चांगले शिक्षण देण्याइतपत पैसे नाहीत, म्हातारपणात रिटायरमेंट साठी कोणतीही तरतूद केलेली नाही, राहायला साधारण दर्जाचे घरसुध्दा नाही किंवा आजारी पडला तर विश्रांती घेऊ शकत नाही, दवाखान्यात जाऊन उपचार घेता येत नाहीत, बँक खात्यात किमान रक्कम राखता येत नाही म्हणून वारंवार दंडसुध्दा भरावा लागतो, कितीतरी गरजा पुढे ढकलाव्या लागतात किंवा कधीच पूर्ण होत नाहीत. (इथे गरजा हा शब्द वापरला आहे. हव्यास नाही). सर्वात महत्त्वाचे, केवळ पैसे नाहीत म्हणून जीवनातला आनंद उडून गेलेला आहे, ही सगळी गरीबाची लक्षणे आहेत. वर उल्लेख केलेल्या वस्तू किंवा सुविधा प्रत्येक माणसाला मिळवता आल्या पाहिजेत. त्या मिळवता येत नसतील तर तो माणूस सध्याच्या स्थितीला गरीब आहे. ही स्थिती बदलली जाऊ शकते. गरीब माणूस श्रीमंत होऊ शकतो.

आता गरीबीची लक्षणे जाणून घेऊ या. आपण गरीब असल्याचा प्रंचड अभिमान बाळगणे, श्रीमंताचा द्वेष करणे, पैशाला वाईट म्हणणे, पैशाने माणूस बिघडतो असे सांगणे, पैशाची बदनामी करणे, काही वाईट घडले की त्याचा संबंध पैशाशी जोडणे, कष्ट करुन श्रीमंत होता येत नाही किंवा मोठ्या प्रमाणावर पैसा कमावता येत नाही असे समजणे, कष्ट करुन मिळवलेलाच पैसा खरा पैसा आहे बाकी सगळा दोन नंबरचा पैसा आहे असे समजणे, कुणीही मोठा झाला (अर्थात श्रीमंत झाला) तर तो सरळ मार्गाने पैसे कमावून मोठा झाला नाही याचा प्रचार करणे, एखाद्या व्यक्तीच्या यशाला चमत्कार म्हणणे, एखादी गोष्ट केवळ मीच करु शकतो आणि इतर कुणी केली तर ती चूक आहे असे समजणे, श्रीमंताच्या घरात जन्माला आले, तरच श्रीमंत होता येते किंवा हुशार मुले पोटी जन्माला आली तरच श्रीमंत होता येते असे वाटणे, श्रीमंत झालेला प्रत्येक माणूस हा कुणालातरी लुबाडून श्रीमंत झाला आहे असे समजणे, प्रत्येक मोठ्या कामामागे एक गुन्हा लपलेला असतो असे समजणे, प्रत्येक सरकारी अधिकारी किंवा राजकारणी भ्रष्टाचार करणारेच आहेत अशी पक्की धारणा असणे, जगात सगळी माणसे लुटण्या-लुबाडण्यासाठीच आहेत असे वारंवार वाटणे, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण या जन्मात काय कोणत्याच जन्मात श्रीमंत होणार नाही, अशी अनेक लक्षणे आहेत. अजून एक, गरीबीतली भाजीभाकरी बरी, पण श्रीमंताची चाकरी नको असे मानणे हे सुध्दा गरीबीचे लक्षण आहे. गरीबाकडे तुम्ही येणार नाही किंवा आम्ही गरीब, तुम्ही श्रीमंत असे वारंवार बोलत राहणे, गरीबीचा उदोउदो करणे किंवा श्रीमंतीला शिव्या घालणे ही सुध्दा नेहमी आढळून येणारी गरीबीची लक्षणे आहेत.

गरीब माणसाची सगळीच्या सगळी लक्षणे असली तरी काही अडचण नाही, मात्र गरीबीची किती लक्षणे आपल्याकडे सध्या आहेत? याचा शोध घेतला पाहिजे, आत्मपरिक्षण केले पाहिजे. ती लक्षणे दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच आपल्याला गरीबीतून वर उठता येईल व समृध्दीच्या मार्गावर वाटचाल करता येईल. गरीबीतून वर उठण्याचे मार्ग उद्याच्या लेखात जाणून घेऊ धन्यवाद.

- अमोल चंद्रकांत कदम, संपादक, नवी अर्थक्रांती
#rich #money #पैसा #गरीब #श्रीमंत

No comments:

Post a Comment