Friday 24 November 2017

अर्थक्रांती भाग 1

पैसा वसे मनी…
भाग ०१ – पैसा गरज, अपेक्षा, वास्तव, समज व गैरसमज
------------------------------------------
०१. फरक गरीबी व श्रीमंतीतला
------------------------------------------
गरीबी म्हणजे अभाव आणि श्रीमंती म्हणजे मुबलकता एवढा साधा फरक गरीबी व श्रीमंतीत आहे. हा फरक फक्त पैशाच्या बाबतीत आहे असे नाही; प्रत्येक बाबतीत गरीबी व श्रीमंती हा फरक आहे. ज्याच्याकडे ज्ञान कमी आहे तो विद्वानापेक्षा गरीब. ज्याच्याकडे लोकसंपर्क कमी आहे तो लोकनेत्यापेक्षा गरीब. ज्याच्याकडे अन्न, वस्त्र व निवाऱ्याची सोय आहे, तो ज्याच्याकडे त्याची सोय नाही त्या भिकाऱ्याहून श्रीमंत. ज्याला चांगले बोलता येते तो अबोलाहून श्रीमंत. ज्याला चांगले खेळता येते तो न खेळणाऱ्याहून अधिक श्रीमंत. हे त्या त्या घटकाच्या तुलनेत गरीबी व श्रीमंती ठरवण्याची परिमाणे आहेत, मात्र सगळ्या गोष्टी एकाच परिमाणात मोजण्यासाठी एक परिमाण बनवण्यात आले, त्याला ‘पैसा’ असे म्हणतात. हाच पैसा मिळवण्याच्या, वाढवण्याच्या, त्याचा योग्य वापर करुन घेण्याच्या वाटा आपण जाणून घेणार आहोत.

शतकानुशतके माणसामाणसात संपत्तीच्या मोजमापानुसार फरक करण्यात आला आहे. राजा व रंक, सावकार व फकीर, गरीब व श्रीमंत अशी थेट विभागणी होत आलेली आहे. जगाच्या अगदी सर्व कोपऱ्यात हीच व्यवस्था आहे. मानवात व इतर सजीवात अनेक फरक असले तरीही संपत्ती निर्माण करणे, तिची गुंतवणूक करणे, त्या संपत्तीत वाढ करणे ही माणसांनी तयार केलेली व्यवस्था आहे. ती निसर्गात इतर कोणत्याही घटकात नाही. प्रत्येकाला पैसा हवा आहे. भौतिक व आरामदायी सुखसुविधा पाहिजे आहेत. त्यामुळे प्रत्येकजण गरीबीतून श्रीमंतीकडे किंवा श्रीमंतीकडून अधिक श्रीमंतीकडे वाटचाल करत असतो. म्हणजे काय तर, आता आहे त्या स्थितीतून वरच्या स्थितीत जाण्याचा प्रयत्न करत असतो. आता गरीबी व श्रीमंतीत मुख्य फरक कोणता हा प्रश्न आपल्याला पडतोच.

गरीबी व श्रीमंतीत अजून काही फरक आहेत. माणसाला गरीब होण्यासाठी कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत. श्रीमंत असणाऱ्या (कोणत्याही बाबतीत) माणसाने त्याचे कार्य सोडले तो आपोआप गरीबीकडे प्रवास करु लागतो. गरीबी ही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर हातमिळवणी करण्यासाठी आतुरलेली असते. ती आपल्याला सतत तिच्याकडे ओढत असते. तिच्या दिशेने वाहवत जायचे की नाही ही निवड प्रत्येक माणसाला स्वतःहून करावी लागते. गरीब होण्याचा प्रवास अत्यंत सोपा आहे. काहीही न करता गरीब होता येते. गरीबी आल्यावर मात्र तिथे टिकून राहण्यासाठी सुध्दा संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष जीवघेणा ठरतो. हा संघर्ष अतिशय जीवघेणा असतो, इतका की यातून वर उठण्यासाठी कमालीचे कष्ट करावे लागतात. हा संघर्ष सोडून दिला की माणसाचे जगणे संपून जाण्याची दाट शक्यता निर्माण होते. एखाद्या मजूराने आठ दिवस काम केले नाही तर त्याच्या जगण्याचे वांधे व्हायला वेळ लागत नाही. मात्र ज्याने पैशाने पैसा कमावायची कला साध्य केली आहे, अशा एखाद्या श्रीमंत माणसाने आठ दिवस काम केले नाही, तर त्याच्या जगण्याचे वांधे होणार नाहीत.

श्रीमंती ही अतिशय प्रयत्नानंतर, युक्तीने, बुध्दीचा वापर करुन किंवा वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक करुन प्राप्त करता येते. श्रीमंतीला आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावरती बोलवता येते. ती स्वतःहून चालून आपल्याकडे येत नाही. आपल्याला ती यावी म्हणून प्रयत्न करावे लागतात. तिला प्रसन्न करावे लागते, मगच ती आपल्याकडे येते. आल्यावर सुध्दा तिला टिकवून राहण्यासाठी सतर्क राहावे लागते. माणूस तिच्या बाबतीत गाफील झाला की ती त्याच्याकडे पाठ फिरवून निघून जाते. ती आली की बऱ्याच चांगल्या गोष्टी घेऊन येते. त्या चांगल्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. वाईट गोष्टींना शिरकाव करु दिला की, तिचा उलट्या दिशेने प्रवास सुरु होतो. म्हणून अशा प्रयत्न प्राप्त केलेल्या श्रीमंतीला किंवा आता ती नसेल तर प्रयत्नांनी प्राप्त कराव्या लागणाऱ्या, टिकवून ठेवण्यासाठी, तिच्यात वाढ करण्यासाठी काय करावे? आता नसलेली श्रीमंती प्राप्त कशी करावी? गरीबीला निरोप कसा द्यावा? या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखमालिकेत असतील तेव्हा पैशाची गरज व श्रीमंतीकडे वाटचाल या विषयावर पुढील लेखात जाणून घेऊ. धन्यवाद!

- अमोल चंद्रकांत कदम, संपादक, नवी अर्थक्रांती.
#rich #money #पैसा #गरीब #श्रीमंत #RichPoor

No comments:

Post a Comment