Sunday 26 November 2017

अर्थक्रांती भाग4

पैसा वसे मनी…
भाग ०१ – पैसा गरज, अपेक्षा, वास्तव, समज व गैरसमज
------------------------------------------
०४. पैसा – समज व गैरसमज
------------------------------------------
पैसा मिळवणे ही सुध्दा एक कला आहे. ती कला साध्य करण्याआधी पैशाविषयी असणाऱ्या मानसिकता, समज – गैरसमज याबद्दल जाणून घेऊ या. नंतर पैसा मिळवण्याचे तंत्र जाणून घेऊ. त्यानंतर पैसा वाढवण्याचे तंत्र जाणून घेऊ या.

पैसा मिळवणे हा शिक्षणाचा उद्देश नसला तरीसुध्दा सुयोग्य शिक्षणातून पैसा मिळाला पाहिजे. जीवनातल्या अनेक गरजा या पैशातून भागवल्या जातात. त्यामुळे पैसा मिळवण्याचे तंत्र हे प्रत्येकाला जमले पाहिजे. बऱ्याच वेळा पैशाविषयी नकारात्मक मानसिकता जोपासल्या जातात किंवा काही वेळा पैशाला नको तेवढे महत्त्व दिले जाते. या दोन्ही टोकाच्या भूमिका सोडून देऊन पैशाचे योग्य महत्त्व जाणून घेतले पाहिजे. तेवढे पैसे कमावले पाहिजेत. अति पैसा आल्यावर माणूस बिघडतो अशा प्रकारे पैशांचा संबंध माणसाच्या चांगुलपणाशी व वाईटपणाशी जोडला जातो. ते ही बरोबर नाही. चांगल्या माणसाने प्रचंड प्रमाणात पैसा कमावला तर तो विधायक (चांगल्या) कामासाठी वापरला जातो. वाईट माणसाने प्रचंड प्रमाणात पैसा कमावला तर तो विध्वंसक कामासाठी वापरला जाईल. त्यामुळे समाजात चांगल्या प्रवृत्तीच्या माणसांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आला पाहिजे. तुम्हाला जर आदर्श निर्माण करायचे असतील. तर पैशाशी फारकत घेऊ नका. विपुल प्रमाणात पैसा कमवा व चांगल्या कार्यात त्यांची गुंतवणूक करा.

आपण नेहमी बोलताना ‘कधीतरी गरीबाकडे येऊन जा’ असे म्हणतो. अशा प्रकारची वाक्ये बोलायची सवय लागली असेल तर कळत नकळत आपली पैशाविषयी नकारात्मक मानसिकता निर्माण झाली आहे असे समजावे. इथून पुढे बोलताना पैशाविषयी जाणीवपूर्वक सकारात्मक बोलायला सूरवात करा. गरीबी कुणालाच नको असते. तरी तिचाच उदो उदो का केला जातो हे कळत नाही? स्वतःला श्रीमंत म्हटले तर काही फरक पडेल का? म्हणजे याचा अर्थ समोरच्याला गरीब म्हणू नका. त्यालाही श्रीमंत म्हणा. पूर्वी राजे महाराजांच्या काळात एकमेकांना हाक मारताना श्रीमंत म्हणून बोलावले जाई. तो एक पैशाविषयी सकारात्मक मानसिकतेचा प्रभाव होता. अशा प्रकारे लक्षपूर्वक आपल्या बोलण्यातल्या पैशाविषयी असलेल्या नकारात्मकता शोधून काढून त्या दूर केल्या पाहिजे. बऱ्याच वेळा ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत त्या माणसातले दोष मोजले जातात, मात्र प्रत्येक व्यक्तीत दोष असतात. ते दोष पैसा आल्यामुळे किंवा न आल्यामुळे बदलत नाहीत. चांगली माणसे पैसा आल्यावरही चांगलीच वागतात.

बऱ्याच वेळा पैशाची तुलना देवाशी केली जाते, मात्र त्यात सुध्दा फारसे काही तथ्य नाही. आपण प्रत्येक गोष्टीचा संबंध पैशाशी जोडतो तिथे गफलत होत असते. देव (आस्तिक लोकांसाठी) हा देवाच्या ठिकाणी आहे, पैसा हा पैशाच्या ठिकाणी आहे. आपल्या हक्काचा पैसा मागताना आपल्याला संकोच वाटत असेल तर ही सुध्दा पैशाबाबतची नकारात्मक भूमिकाच आहे. पैसा हातचा मळ आहे असे समजून पैसा बेफिकीरीने वापरणे हा सुध्दा एक प्रकारचा पैसे व्यवस्थापनातला दोषच आहे. त्याशिवाय काटकसरीच्या नावाखाली जीवनातील महत्त्वपूर्ण गरजा दाबून टाकणे हा पैशाचा अपमान आहे. दिवाळीला आपण लक्ष्मीपूजन करतो. हा पैशाविषयीचा एक चांगला संस्कार आहे. लक्ष्मीची व सरस्वतीची तुलना बऱ्याच वेळा केली जाते. ही तुलना करुच नये. शिक्षण हे महत्त्वाचे आहे तेवढाच पैसा पण महत्त्वाचा आहे. एखाद्याला हात महत्त्वाचे की डोळे महत्त्वाचे? असा प्रश्न विचारण्यासारखे हे होईल. बचत करणे व गुंतवणूक करणे हे सुध्दा पैशाबाबतचे चांगले संस्कार आहेत. ठराविक प्रमाणात योग्य ठिकाणी (शक्यतो विधायक कार्यासाठी) पैसा दान करणे हा सुध्दा पैशाबाबतचा अजून एक चांगला संस्कार आहे.

बऱ्याच वेळा पैशाने काय मिळते व काय मिळत नाही याचे तक्ते विकत घेऊन घरात लावले जातात. पैशाने चांगला बिछाना विकत घेऊ शकतो झोप नाही. पैशाने पुस्तके विकत घेता येतात शहाणपण नाही. अशा प्रकारची वाक्ये त्या तक्त्यावर लिहलेली असतात. हे ही चूकच आहे. पाण्याने तहान भागवली जाते. श्वासामुळे प्राणावायूची गरज भागवली जाते. यात अदलाबदल शक्य नाही. पाण्यातून प्राणवायू घेता येणार नाही किंवा श्वास घेतल्यामुळे तहान भागवली जाणार नाही. त्याचप्रमाणे बिछाना विकत घेणे व पुस्तके विकत घेणे ही पैशाने होणारी कामे आहेत. झोप लागणे व शहाणपण येणे ही पैशाच्या कार्याक्षेत्राबाहेरील प्रक्रिया आहे. त्यात पैशाचा काहीच दोष नाही. त्यामुळे अशा गोष्टींचा पैशांशी संबंध जोडू नये. व्यक्तिमत्वाच्या इतर पैलूंसोबत पैशाची तुलना करु नये. अशा प्रकारे पैशाविषयी आपली समज समृध्द करु या. धन्यवाद.
मग काय म्हणता? श्रीमंत वाचकहो, पटलं की नाही?

- अमोल चंद्रकांत कदम, संपादक, नवी अर्थक्रांती.
#rich #money #पैसा #गरीब #श्रीमंत

No comments:

Post a Comment