Thursday 7 December 2017

पैशाचे नियोजन2

पैसा वसे मनी…
भाग ०२ – नियोजन आणि महत्त्व
------------------------------------------
११.१ पैशाची निर्मिती
-----------------------------------------
पैशातून पैसे मिळवण्यासाठी किंवा पैशाची योग्य गुंतवणूक करुन त्यात वाढ करण्यासाठी पैशाच्या झाडाबाबत आपण माहिती करुन घेतले. त्यात आपल्याला असे आढळून आले की, पैशाची निर्मिती करण्यासाठी पैसेच पेरावे लागतात. मग मुळात पेरण्यासाठी पैसे आणायचे कुठून? तर आपण प्रत्येकजण पैसा कमावतो. त्याचे अनेक मार्ग आपल्याला माहिती असतात. काहीजण नोकरीतून पैसा कमावतात, काहीजण व्यवसायातून पैसा कमावतात, काहीजण अन्य काही मार्गाने पैसे कमावतात/ मात्र कमावलेले पैसे एवढ्या लवकर खर्च होऊन जातात की, बचत किंवा गुंतवणूक करण्यासाठी अजून पैसा आणायचा कुठून? काहीजणांना हा प्रश्न पडतो. बऱ्याचजणांकडे तुटपुंजे उत्पन्न असते. अशावेळी अजून पैसा कमावला पाहिजे ही इच्छा मनात घर करुन बसते. प्रत्येक माणसाला भरपूर पैसे कमवावे ही इच्छा असते. बहुतांश लोक त्यासाठी प्रयत्न करत नाहीत किंवा त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दिशा चुकते. योग्य दिशेचा किंवा मार्गांचा शोध घेण्याऐवजी चुकीच्याच दिशेने कित्येक वर्षे काम करत राहतात. तेव्हा नवीन मार्गाचा शोध घेतला पाहिजे. आहे त्या पैशाचे सुध्दा योग्य नियोजन केले पाहिजे. हे नियोजन कसे करायचे ते आपण उद्या पाहू या.

त्याआधी एक गोष्ट सांगतो, म्हणजे आपल्याला पैशाची निर्मिती करताना कोणत्या मार्गाचा अवलंब करायला पाहिजे त्याचा अंदाज येईल. एका शेतकऱ्याची बायको धान्य निवडत बसलेली असते. त्यावेळी एक माणूस जवळून चाललेला असतो. त्याचा व शेतीचा दूरदूर पर्यंत संबंध नसतो. त्याला धान्य निवडण्याचे काम पाहण्याचे कुतूहल निर्माण होते. ती शेतकऱ्याची बायको फुटके, बारीक दाणे एका बाजूला काढते. चांगले, मोठे टपोरे दाणे दुसऱ्या बाजूला काढते. अशी विभागणी केल्यावर चांगले टपोरे दाणे ती व्यवस्थितपणे जपून ठेवते. फुटक्या व बारीक दाण्यांना दळण्यासाठी काढते. मग तो माणूस त्या शेतकऱ्याच्या बायकोला प्रश्न विचारतो, “या चांगल्या, मोठ्या टपोऱ्या दाण्याचे काय करणार? आणि या लहान, फुटक्या दाण्यांचे काय करणार?” ती भोळी शेतकरीण त्याला सहज उत्तर देते. “या फुटक्या दाण्यांना दळून त्याची भाकरी करणार. माझ्या मुलांना व नवऱ्याला तसेच मला खाण्यासाठी ही भाकरी उपयोगात येईल” मग तो माणूस म्हणतो, “या मोठ्या टपोऱ्या दाण्यांचे काय करणार?” त्यावर शेतकऱ्याची बायको म्हणते, “हे दाणे आम्ही रानात नेऊन टाकणार.” त्यावर तो माणूस मनातल्या मनात हसतो आणि विचार करतो काय ही वेडपट बाई आहे. फुटक्या दाण्याची भाकरी करुन आपल्या मुलांना व नवऱ्याला घालणार आणि चांगले दाणे मातीत टाकणार. त्याला राहवत नाही, म्हणून तो तिलाच विचारतो, “हे चांगले, मोठे टपोरे दाणे रानात नेऊन टाकणार म्हणजे मातीतच टाकणार. त्याचा काय फायदा? त्याउलट तुमच्या जागी मी असतो तर चांगले मोठे टपोरे दाणे दळून त्याची भाकरी करुन खाल्ली असती, अन् हे फुटके व बारीक दाणे मातीत फेकून दिले असते.” आता शेतकरीण मनातल्या मनात हसते व त्याला म्हणते, “साहेब तुम्ही लय शिकलेले दिसता. फुटके दाणे रानात टाकल्यावर उगवून येत नाहीत. आज चांगल्या दाण्याची भाकरी करुन खाल्ली तर उद्या कुठे जायचे? काय खायचे? त्याउलट आज फुटक्या दाण्याची भाकरी करुन खाल्ली व चांगले दाणे रानात पेरले तर त्यातून काही महिन्यांनी भरपूर धान्य येईल. मग त्याच्या पाहिजे तेवढ्या भाकरी करुन खाता येतील.” त्याला जे काही समजायचे ते समजते, तो निघून जातो.

आपल्याला या गोष्टीवरुन हा बोध घ्यावा लागेल की, आपल्या उज्ज्वल उद्यासाठी काही पैशांची गुंतवणूक केल्यास त्यातून जर आपले आयुष्य दीर्घकाळासाठी सुखी व आरामदायी होणार असेल तर आपल्याकडे असलेल्या पैशातून नियोजन केले पाहिजे. आजच खाण्याच्या नादात उद्याची उपासमार होणार असेल, तर आजच्या खाण्यात बदल करुन उद्यासाठी नियोजन करणे महत्त्वाचे असते. हे करत असताना अजून एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे असते. उद्या काहीतरी चांगले होईल म्हणून आजच्या आयुष्याचा मोठ्या प्रमाणात विध्वंस करु नये. थोडा सारासार विचार करुन गुंतवणूक व नियोजन करण्याबरोबरच आजच्या जीवनाचा सुध्दा आनंद घेतला पाहिजे. धन्यवाद.

- अमोल चंद्रकांत कदम, संपादक, नवी अर्थक्रांती
#rich #money #पैसा #गरीब #श्रीमंत #मनी #गुंतवणूक #Investment #FinancialPlanning

No comments:

Post a Comment