Wednesday 6 December 2017

पैश्याचे नियोजन 1

पैसा वसे मनी…
भाग ०२ – नियोजन आणि महत्त्व
------------------------------------------
११. पैशाची निर्मिती
-----------------------------------------
‘पैसे झाडाला लागत नाहीत’, अशा अर्थाची अनेक वाक्ये आपल्याला नेहमी ऐकू येत असतात. मान्य आहे की पैसे कुठल्या भौतिक झाडांना प्रत्यक्षपणे लागत नाहीत, मात्र प्रत्येक झाडाची व्यवस्थित लागवड केली, त्याला खत, पाणी, निरोगी हवा व स्वच्छ सूर्यप्रकाश यांचा योग्य प्रमाणावर पुरवठा केला, तर ती झाडे आपल्याला पैसे मिळवून देतात; मग ती झाडे वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. त्यात आंबा, नारळ, कापूस, ऊस, तुरी, बाजरी किंवा अगदी वेड्या बाभळीच्या झाडांचा सुध्दा समावेश होतो, मात्र ज्या झाडांना थेट पैसे लागतात अशा झाडांची माहिती या लेखात आहे.

आतापर्यंत आपण पैशाबद्दल असणारे समज व गैरसमज, वास्तव, अपेक्षा याबाबत माहिती पाहिली. समृध्दी प्राप्तीच्या वाटा माहिती करुन घेतल्या, मात्र पैसा हा संपत्ती व समृध्दी प्राप्ती करण्यासाठी लागणारा मुख्य घटक आहे. मग हा मुख्य घटक निर्माण करायला शिकले पाहिजे.

आता पैशाचे झाड लावण्याची प्रक्रिया पाहू या. आंब्याचे झाड लावण्यासाठी आंब्याची कोय (बाठ), सफरचंदाचे झाड लावण्यासाठी सफरचंदाचे बीज गरजेचे आहे. कारण निसर्गाचा नियम आहे, ज्या प्रकारचे बी तुम्ही पेराल त्याच्या अनेकपट फळे ते झाड तुम्हाला देते. त्यासाठी अटी लागू असतात. आज झाड लावले की, उद्या लगेच फळे लागत नाहीत. त्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागतो. त्यासाठी बी पेरण्याआधी चांगली मशागत केलेली शेतजमीन, बी पेरल्यानंतर ठराविक काळानंतर खत, पाणी, संरक्षण, शुध्द हवा, स्वच्छ सूर्यप्रकाश या घटकांचा पुरवठा करावा लागतो. मध्ये पिकावर रोग पडला तर फवारणी करुन कीटकांचा नाश करावा लागतो. नको असणारे व पिकांच्या वाढीसाठी अडथळा निर्माण करणारे गवत काढावे लागते. त्यानंतर ही फळे लागतात. फळे पिकेपर्यंत त्याची राखण करावी लागते. त्यानंतर ती खाण्याचा किंवा बाजारात नेऊन विकण्याचा व त्यातून पैसे मिळवण्याचा आनंद घेता येतो.

वरीलप्रमाणेच पैशाचे झाड लावण्यासाठी पैसेच पेरावे लागतात. थोडे पैसे पेरले की त्यातून अनेकपट पैसे निर्माण करता येतात. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. सुपीक जमिनीची निवड करणे म्हणजेच पैसा गुंतवणूकीसाठी योग्य माध्यमांची निवड करावी लागते. कधीकधी त्यात थोडाफार बदलसुध्दा करावा लागतो. प्रत्यक्षातील संधीचा आढावा घ्यावा लागतो. पैसा वाढवताना येणाऱ्या अडचणी दूर कराव्या लागतात. वेळोवेळी नियोजनाचे पुनरावलोकन करावे लागते. मग योग्य वेळी उत्तम पैसे आपल्याला प्राप्त होतात. पैशाची वाढ करण्यासाठी पैशाच्या गुंतवणुकीचे झाड लावावे लागेल. नियोजनाचे खतपाणी द्यावे लागेल.

हे सगळं करण्यासाठी मुळात थोडाफार तरी पैसा आपल्याकडे असला पाहिजे. नसला तर तो कमावला पाहिजे. त्यानंतर त्याची बचत केली पाहिजे. हळूहळू बचतीकडून गुंतवणूकीकडे वाटचाल झाली पाहिजे.

हे लावलेले पैशाचे झाड किती दिवसात किती पट पैसा देऊ शकेल याचा अंदाज आपल्याला बांधता यावा म्हणून अजून एक शेतीचे उदाहरण पाहू या.
ज्याला आठवडाभरात किंवा पंधरा दिवसात पीक पाहिजे असते तो शेतकरी कोथिंबीर लावतो. ज्याला महिन्या दोन महिन्यात पीक पाहिजे तो शेतकरी पालेभाज्या लागवड करतो. ज्याला चार ते सहा महिन्यांनी पीक पाहिजे असा शेतकरी ज्वारी, बाजरी, कांदे, मका, गहू यासारखी पिके घेतो. ज्याला वर्षभरात पीक पाहिजे तो ऊस किंवा बटाटा यांची शेती करतो. ज्याला दोन ते अडीच वर्षांनी पाहिजे तो लिंबू किंवा इतर पिके घेतो. ज्याला पाच वर्षात पीक हवे असते तो आंब्याची, नारळाची झाडे लावतो. कोथिंबीरीच्या तुलनेत पालेभाज्या, ज्वारी, ऊस हे चढत्या क्रमाने जास्त नफा मिळवून देतात. लिंबू व आंबे यासारखी वृक्षरुपी पिके एकदाच लागवड करुन अनेक वर्षे उत्पादन देतात. त्याचप्रमाणे पैशाच्या गुंतवणुकीची अनेक माध्यमे आहेत. काही अल्पमुदतीची आहेत तर काही दीर्घमुदतीची आहेत. काही मध्यम मुदतीची आहेत. काही माध्यमात जोखीम (risk) जास्त व परतावा (returns) चांगला आहे, तर काही माध्यमात जोखीम व परतावा कमी आहे. काही माध्यमात गुंतवणुकीचे पैशात रुपांतर करायला जास्त वेळ लागतो, तर काही माध्यमात हा वेळ कमी प्रमाणात लागतो. अशा सगळ्या गुंतवणुकीच्या माध्यमांची ओळख व माहिती पुढे करुन घेऊ या. धन्यवाद.

- अमोल चंद्रकांत कदम, संपादक, नवी अर्थक्रांती
#rich #money #पैसा #गरीब #श्रीमंत #मनी #MoneyPlant #पैशांचेझाड

No comments:

Post a Comment