Sunday 30 April 2017

गांडूळ खतनिर्मिती.

_*दर्जेदार गांडूळ खतनिर्मितीचा दुष्काळी शेतीला आधार*_

सातारा जिल्ह्यात अंभेरी (ता. खटाव) येथील उच्चशिक्षित किरण शिंदे या शेतकरी महिलेने गेल्या दहा वर्षांपासून दुष्काळी भागात गांडूळ खतनिर्मिती व्यवसाय नेटाने चालवला आहे. पती शिक्षक असल्याने या व्यवसायाची जवळपास सर्वच धुरा त्यांनी हिमतीने आपल्या अंगावर पेलली आहे. खताची गुणवत्ता जपत परिसरातील अधिकाधिक शेतकऱ्यांकडून या खतास कायम मागणी राहिली आहे.
विकास जाधव

सातारा जिल्ह्यात अंभेरी हे खटाव व कोरेगाव तालुक्यांच्या हद्दीवर असलेले सुमारे १६०० लोकसंख्येचे गाव. कायम पाणीटंचाई असल्याने गावात पूर्वी गंभीर दुष्काळी परिस्थिती होती. नाही म्हणायला गावात दोन तलाव झाल्याने काही प्रमाणात गावातील शेती बागायती झाली. त्यामुळे ऊस, आले ही नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला.

किरण शिंदे यांची शेती
गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये महिला शेतकरी किरण शिंदे यांचे नाव घ्यावे लागेल. एम.ए., बी.एड.पर्यंत त्यांचे शिक्षण झाले अाहे. पती विष्णुपंत माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. मुलगा ओंकार राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात पीएच.डी. करीत आहे. कुटुंबातील सारे सदस्य उच्चशिक्षित असून सर्वांना शेतीची आवड आहे. शिंदे कुटुंबीयांची संयुक्त अशी ३० ते ३५ एकर शेती आहे. शेतीची जबाबदारी किरण यांचे दीर जयसिंग पाहतात.

पूरक व्यवसायास चालना
शेतीला पूरक म्हणून शिंदे यांनी २००२ मध्ये ४३ बाय २६ फूट लांबी-रुंदीचा गोठा बांधून चार मुऱ्हा म्हशींची खरेदी केली. जनावरांची जबाबदारी किरणच पाहायच्या. सन २००४ मध्ये गावासह तालुक्यात दुष्काळ पडल्याने चारा व पाण्याअभावी जनावरे विकावी लागली. यामुळे गोठा रिकामा ठेवण्याएेवजी जागेचा विनियोग केला पाहिजे, हा विचार मनात सुरू होता. दरम्यान, रेडिओवर प्रगतिशील शेतकरी रामदास हिंगणे यांची गांडूळ खतनिर्मिती संदर्भात मुलाखत ऐकण्यास मिळाली. आपणही गांडूळ खत प्रकल्प सुरू करावा असा विचार किरण यांनी घरी बोलून दाखवला, त्यासंबंधी निर्णयही घेतला.

प्रकल्प उभारणी व नियोजन
गोठ्याची जागा तयार होतीच. तेथेच २००६ मध्ये गांडूळ खत प्रकल्प सुरू केला.
त्यात पाच बेड तयार केले. घरी तीन म्हशी होत्या. त्यांच्या शेणाचा वापर सुरू केला. अनुभवाअभावी खताची पहिली बॅच तयार होण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी गेला. प्रकल्पातील त्रुटी लक्षात येऊ लागल्या. पुढे बेड बंदिस्त करून घेतले. पुढील बॅचमध्ये अडीच महिन्यांत खत तयार झाले. मात्र, ते क्षमतेपेक्षा कमीच होते. पाणी निघून जात नसल्याने बेडमध्ये अोलावा राहात होता. यामुळे गोठा आणि बेडमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला.

नव्या सुधारणा
सन २००७ मध्ये सुमारे ४६ बाय २६ फूट आकाराचे शेड बांधले. त्यात लहान बेडऐवजी अखंड कडाप्पाचे बेड तयार केले. पाण्याचा निचरा व्हावा, तसेच व्हर्मिवाॅश संकलित करता यावे यादृष्टीने बेडला उतार देत, पाइपलाइन करून ते टाकीत सोडले. गांडूळ खत ठेवण्यासाठी शेजारी खोली बांधली. दोन्ही शेड मिळून सहा बेड तयार झाले. शेडची रचना तांत्रिकदृष्ट्या चांगली झाल्यावर गांडूळ खतही चांगल्या प्रतीचे तयार होऊ लागले. व्यवसायाला गती येऊ लागली. प्रकल्पास मृदुल गांडूळ कल्चर व खतनिर्मिती विक्री केंद्र असे नाव दिले.

व्यवसायवृद्धी
फळबागांसह आले पिकासाठी गांडूळ खताची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होऊ लागली.
परिसरातील पाच ते सहा महिलांना प्रशिक्षित करत किरणताईंनी त्यांना रोजगार निर्माण करून दिला. प्रत्येक बॅच सुमारे दीड ते दोन महिन्यांत तयार होऊ लागली. वर्षातून सुमारे सात बॅचमधून खत तयार होऊ लागले. गावात जनावरांची संख्या मोठी असल्याने शेणखत मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागले. प्रकल्पाचे नाव बारदानावर छापून ५० किलो पॅकिंगमधून तयार गांडूळ खताची विक्री होऊ लागली. सुरवातीच्या काळात तीन रुपये प्रतिकिलो दराप्रमाणे ५० किलो खत १५० रुपयांना विकण्यास सुरवात केली.

व्यवसायातील महत्त्वाच्या बाबी
-सुमारे ७० ते ८० ट्रेलर शेणखताची स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी
- मजुरांना प्रशिक्षण. नियमित पाच मजुरांना रोजगार.
- बेडमध्ये शेण भरताना ते थंड असल्याची खात्री केली जाते, यामुळे गांडुळांना इजा होत नाही.
- शेण भरल्यानंतर सर्व बेड बारदाना किंवा शेडनेटने झाकून ठेवले जातात, यामुळे कुजण्याची प्रक्रिया लवकर होते.
- तयार झालेले गांडूळ खत चाळूनच गोडाउनमध्ये ठेवले जाते.
- सुटे न विकता ५० किलोच्या पॅकिंगमधून विकले जाते.
- खताचा दर्जा कायम चांगला ठेवण्याचा प्रयत्न.
- व्यवसायातील सर्व टिपणे ठेवली जातात.
- गांडूळ कल्चरचीही ४०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री
- व्हर्मिवाॅश देताना शक्यतो कोणते शुल्क घेतले जात नाही.

अर्थशास्त्र
खत, भरणी व वाहतुकीसाठी ३५ हजार रुपये, मजुरी १५ हजार रुपये, पाच हजार रुपये बारदानासाठी (पालापाचोळा घरचा असल्याने यासाठी खर्च नाही), असा प्रतिबॅचमागे सुमारे ५५ हजार रुपये खर्च येतो. प्रतिबॅचमध्ये नऊ टन गांडूळ खत तयार होते. शेणखत किंवा कच्च्या मालाचे दर वाढल्याने गांडूळ खताचे दर वाढवणे गरजेचे झाले आहे. सध्या ५० किलोची बॅग ५०० रुपये या दराने विकली जाते.

विक्री दृष्टिक्षेपात
वर्ष-------------------खतनिर्मिती--------------- दर प्रतिटन (रु.)
२०१३------------------६० टन-------------------७ हजार
२०१४------------------६० टन-------------------८ हजार
२०१५------------------६५ टन------------------८ हजार ५००
२०१६-----------------६० टन--------------------८ हजार ५००

मदत व मार्गदर्शन
किरण यांना व्यवसायात पती विष्णुपंत, मुलगा अोंकार यांची मोठी मदत होते. रामदास हिंगणे यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरले आहे. महाबळेश्र्वर, खटाव, कऱ्हाड तालुक्यांतील शेतकऱ्यांकडून खताला कायम मागणी असते. विशेष मागणी फळबागांसाठी असते. गेल्या दोन वर्षांत किंवा यंदाच्या वर्षी तर शेतमालाचे दर कमी झाल्यामुळे, नोटाबंदीमुळे गांडूळ खत मागणीवर काही प्रमाणात परिणाम झाला असल्याचे किरणताईंनी सांगितले.

घर, व्यवसाय अन् बचत गटही
घरातील सर्व कामे सांभाळून किरणताई व्यवसायही सांभाळतात. त्याचबरोबर २५ सदस्य असलेला महिला बचत गटही त्या सांभाळतात. गेल्या दहा वर्षांच्या अनुभवात अलीकडील काळात गांडूळ खताचा वापर शेतकरी मंडळी अधिक प्रमाणात करीत असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे.

No comments:

Post a Comment