Sunday, 30 April 2017

पालक शेती

12 गुंठ्यांत वर्षभर पालक

निलखन यांच्या शेती नियोजनातील वैशिष्ट्ये
एखाद्या पिकाचे योग्य नियोजन केले तर अवघ्या काही गुंठे क्षेत्र असलेल्या शेतीतूनही प्रगतीचा मार्ग कसा सुकर होतो, याचा आदर्श अकोला जिल्ह्यातील चांदूर (खडकी) गावच्या मुरलीधर निलखन आणि त्यांच्या कुटुंबाने घालून दिला आहे. बारा गुंठे क्षेत्रातील पालक भाजीपाला पिकात वर्षभर सातत्य ठेवल्याच्या परिणामीच ही किमया साधता आल्याची प्रामाणिक कबुली ते देतात.
अकोला महानगरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावरील चांदूर गाव हे मोर्णा नदीच्या काठावर वसलेले असल्याने गावात पाण्याचे स्रोत भक्‍कम आहेत. विहीर, बोअरवेल यासारख्या पर्यायांचा वापर करीत गावातील शेतकऱ्यांनी शेतीचा वारसा जपला आहे.
निलखन कुटुंबीयांची शेती सिंचन सुविधांच्या बळावर समृद्धीच्या वाटेवर असलेल्या चांदूर गावातील बहुतांश शेतकरी पारंपरिक पीक पद्धतीऐवजी फुले व भाजीपाला शेतीकडे वळले आहेत. याच गावचे मुरलीधर निलखन त्यापैकीच एक. बारमाही भाजीपाला म्हणून पालक घेण्यावर त्यांचा भर राहतो. त्यांची जेमतेम बारा गुंठे जमीन धारणा. त्यांचे वडील सूर्यभान कधीकाळी गहू, खरीप ज्वारी यासारखी पिके घेत; परंतु बारा गुंठ्यांतून मिळणाऱ्या उत्पादनातून कुटुंबात पत्नी, पाच मुली, दोन मुलांसह असलेल्या संसारात उदरनिर्वाह कसाबसा शक्‍य होत होता. मुलांचे शिक्षण, कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पैशांची सोय सूर्यभान यांना पत्नीसह मजुरीला जाऊन मिळणाऱ्या उत्पन्नातून करावी लागे.
बदलाचे निमित्त.. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात काही वर्षांपूर्वी झालेल्या शेतकरी मेळाव्यात सूर्यभान यांना भाजीपाला पिकातून होणाऱ्या प्रगतीविषयी माहिती मिळाली. त्यानंतर पारंपरिक पिकांऐवजी भाजीपाला पिकाकडे वळताना त्यांनी पालकाची निवड केली. त्याची शेती चांगली केली. उत्पन्न कमावले. त्यामुळे त्यांच्या दोन मुलांनीही या पिकात सातत्य ठेवले. विशेष म्हणजे सूर्यभान निलखन यांनी सायकलने अकोल्यात पालकाचे मार्केटिंग रोज केले.
निलखन यांच्या पालक लागवडीचा पॅटर्न
एकूण शेती सुमारे 12 गुंठे, त्यातच पालक घेतला जातो.
बारा गुंठ्यांचे प्रत्येकी चार गुंठे याप्रमाणे तीन भाग केले आहेत.
प्रत्येक भागातील लागवडीत सुमारे आठ ते दहा दिवसांचे अंतर
त्यामुळे एका प्लॉटमधील काढणी संपते, त्या वेळी दुसऱ्या प्लॉटमध्ये उत्पादन सुरू असते व ते विकण्यास उपलब्ध होत असते.
अशा रीतीने वर्षभर हे चक्र सुरू राहत
लागवड पद्धत पालकाची लागवड वाफे पद्धतीने केली जाते. उन्हाळ्यात नागमोडी पद्धतीचे वाफे असतात.
शेणखत - वर्षातून 12 गुंठ्याला चार ट्रॉली शेणखत जमिनीत मिसळले जाते. घरी जनावरे नसल्याने शेणखत 2500 रुपये प्रति ट्रॉलीप्रमाणे विकत घेतले जाते. शेणखताच्या वापरावर अधिक भर असल्याने रासायनिक खतांचा वापर शक्‍यतो कमी केला जातो. पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास कीडनाशकाची फवारणी करावी लागते.
उत्पादन कसे असते
सुमारे चार गुंठ्यांचा प्लॉट
एक महिना पिकाचा कालावधी
प्रति महिना 500 ते 600 किलो पालक मिळतो.
उन्हाळा व हिवाळ्यात उत्पादन चांगले, तर पावसाळ्यात खराब होत असल्याने 300 किलोपर्यंतही खाली येत
बाजारपेठ
अकोला बाजारपेठ सुमारे आठ किलोमीटर अंतरावर आहे. प्लॅस्टिक गोणपाटाचे भारे तयार करून त्यातून पालकाची वाहतूक केली जाते.
हंगामनिहाय प्रति किलो सरासरी पाच रुपयांपासून ते वीस रुपयांपर्यंतचा दर मिळतो.
वर्षभर होत असलेल्या आवकेनुसार दरात चढ-उतार राहतात. सध्या पालकाला किलोला 40 रुपये दर सुरू असल्याचे मुरलीधर म्हणाले.
महिन्याला सुमारे नऊ हजार ते कमाल 12 हजार, 15 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.
मुख्य खर्चामध्ये बियाणे चार गुंठ्याला दोन किलो लागते. किलोला 120 रुपये या दराने ते घेतले जाते.
बाकी मुख्य खर्च खतांवर होतो. दररोज 20 ते 25 रुपये रिक्षा वाहतुकीला दिले जातात.
वर्षाला बारा गुंठे क्षेत्रात वर्षभर पीक सुरू ठेवून एक ते सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.
मार्केट मुरलीधर म्हणाले, की उन्हाळ्यातील मे ते जुलै या काळात, तसेच पावसाळ्याच्या सुरवातीला पालकाला दर चांगले मिळतात. पावसाला सुरवात झाल्याने जादा पावसाच्या परिणामी पालक सडण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे तो खराब होतो, परिणामी त्याचे दरही वधारतात. अकोला भाजी बाजारात व्यापाऱ्यांमध्ये निलखन कुटुंबाच्या पालकाने दर्जेदार अशी ओळख निर्माण केली आहे.
आर्थिक स्थैर्याकडे नेणारे पीक पालक हेच पीक निलखन कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याचे कारण ठरले आहे. यातून मुरलीधर निलखन यांना आपल्या पाच बहिणींचे लग्न चांगल्या प्रकारे करणे शक्‍य झाले. मुरलीधर यांच्यासह त्यांचा भावाचा विवाह देखील याच पीक पद्धतीतून आलेल्या उत्पन्नातून होऊ शकला. हलाखीच्या परिस्थितीत मातीच्या घरात राहणारे हे कुटुंब आज टुमदार बंगलावजा घरात स्थलांतरित झाले आहे. गाठीशी पैसा जुळू लागल्याने सुमारे 50 गुंठे क्षेत्र त्यांनी खरेदी केले आहे. विदर्भातील शेतकऱ्यांनीही या कुटुंबाप्रमाणे आपल्या शेतीचे नियोजन व गुणवत्तेत सातत्य ठेवले, तर त्यांच्या प्रगतीचे दालन नक्कीच खुले होऊ शकते.
शेतीत राबते संपूर्ण कुटुंब पालकाच्या शेतीत संपूर्ण कुटुंब राबते. विशेषतः पालकाची काढणी घरचे सर्व सदस्य करतात. काढणीपासून ते त्याची स्वच्छता, हाताळणी, वाहतूक अशा प्रत्येक टप्प्यावर घरच्यांकडून योग्य दक्षता घेत असल्यानेच
पालकाची गुणवत्ता टिकवणे शक्‍य होते, असे मुरलीधर म्हणाले. आई पार्वताबाई, बंधू किशोर आदी सर्वांची मदत मोलाची ठरते. मजुरीवर होणारा खर्च कुटुंबाने कमी केला आहे.
निलखन यांच्या शेती नियोजनातील वैशिष्ट्ये 1) दरवर्षी शेणखताचा वापर, त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत.
2) पालक पिवळसर दिसत असल्यास, जमिनीत नत्राची कमतरता असल्याचे लक्षात आल्यास थोड्या प्रमाणात युरिया खताचा वापर.
3) मजुरांऐवजी कुटुंबीयांद्वारे पालकाची काढणी प्रतवारी करून केली जाते.
4) पालक पिकाला पाण्याची चांगली गरज असते. उन्हाळ्यात एक दिवसाआड, तर हिवाळ्यात तीन ते पाच दिवसांआड पाटाने पाणी दिले जाते.
संपर्क
निलखन
9850597031

गांडूळ खतनिर्मिती.

_*दर्जेदार गांडूळ खतनिर्मितीचा दुष्काळी शेतीला आधार*_

सातारा जिल्ह्यात अंभेरी (ता. खटाव) येथील उच्चशिक्षित किरण शिंदे या शेतकरी महिलेने गेल्या दहा वर्षांपासून दुष्काळी भागात गांडूळ खतनिर्मिती व्यवसाय नेटाने चालवला आहे. पती शिक्षक असल्याने या व्यवसायाची जवळपास सर्वच धुरा त्यांनी हिमतीने आपल्या अंगावर पेलली आहे. खताची गुणवत्ता जपत परिसरातील अधिकाधिक शेतकऱ्यांकडून या खतास कायम मागणी राहिली आहे.
विकास जाधव

सातारा जिल्ह्यात अंभेरी हे खटाव व कोरेगाव तालुक्यांच्या हद्दीवर असलेले सुमारे १६०० लोकसंख्येचे गाव. कायम पाणीटंचाई असल्याने गावात पूर्वी गंभीर दुष्काळी परिस्थिती होती. नाही म्हणायला गावात दोन तलाव झाल्याने काही प्रमाणात गावातील शेती बागायती झाली. त्यामुळे ऊस, आले ही नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला.

किरण शिंदे यांची शेती
गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये महिला शेतकरी किरण शिंदे यांचे नाव घ्यावे लागेल. एम.ए., बी.एड.पर्यंत त्यांचे शिक्षण झाले अाहे. पती विष्णुपंत माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. मुलगा ओंकार राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात पीएच.डी. करीत आहे. कुटुंबातील सारे सदस्य उच्चशिक्षित असून सर्वांना शेतीची आवड आहे. शिंदे कुटुंबीयांची संयुक्त अशी ३० ते ३५ एकर शेती आहे. शेतीची जबाबदारी किरण यांचे दीर जयसिंग पाहतात.

पूरक व्यवसायास चालना
शेतीला पूरक म्हणून शिंदे यांनी २००२ मध्ये ४३ बाय २६ फूट लांबी-रुंदीचा गोठा बांधून चार मुऱ्हा म्हशींची खरेदी केली. जनावरांची जबाबदारी किरणच पाहायच्या. सन २००४ मध्ये गावासह तालुक्यात दुष्काळ पडल्याने चारा व पाण्याअभावी जनावरे विकावी लागली. यामुळे गोठा रिकामा ठेवण्याएेवजी जागेचा विनियोग केला पाहिजे, हा विचार मनात सुरू होता. दरम्यान, रेडिओवर प्रगतिशील शेतकरी रामदास हिंगणे यांची गांडूळ खतनिर्मिती संदर्भात मुलाखत ऐकण्यास मिळाली. आपणही गांडूळ खत प्रकल्प सुरू करावा असा विचार किरण यांनी घरी बोलून दाखवला, त्यासंबंधी निर्णयही घेतला.

प्रकल्प उभारणी व नियोजन
गोठ्याची जागा तयार होतीच. तेथेच २००६ मध्ये गांडूळ खत प्रकल्प सुरू केला.
त्यात पाच बेड तयार केले. घरी तीन म्हशी होत्या. त्यांच्या शेणाचा वापर सुरू केला. अनुभवाअभावी खताची पहिली बॅच तयार होण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी गेला. प्रकल्पातील त्रुटी लक्षात येऊ लागल्या. पुढे बेड बंदिस्त करून घेतले. पुढील बॅचमध्ये अडीच महिन्यांत खत तयार झाले. मात्र, ते क्षमतेपेक्षा कमीच होते. पाणी निघून जात नसल्याने बेडमध्ये अोलावा राहात होता. यामुळे गोठा आणि बेडमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला.

नव्या सुधारणा
सन २००७ मध्ये सुमारे ४६ बाय २६ फूट आकाराचे शेड बांधले. त्यात लहान बेडऐवजी अखंड कडाप्पाचे बेड तयार केले. पाण्याचा निचरा व्हावा, तसेच व्हर्मिवाॅश संकलित करता यावे यादृष्टीने बेडला उतार देत, पाइपलाइन करून ते टाकीत सोडले. गांडूळ खत ठेवण्यासाठी शेजारी खोली बांधली. दोन्ही शेड मिळून सहा बेड तयार झाले. शेडची रचना तांत्रिकदृष्ट्या चांगली झाल्यावर गांडूळ खतही चांगल्या प्रतीचे तयार होऊ लागले. व्यवसायाला गती येऊ लागली. प्रकल्पास मृदुल गांडूळ कल्चर व खतनिर्मिती विक्री केंद्र असे नाव दिले.

व्यवसायवृद्धी
फळबागांसह आले पिकासाठी गांडूळ खताची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होऊ लागली.
परिसरातील पाच ते सहा महिलांना प्रशिक्षित करत किरणताईंनी त्यांना रोजगार निर्माण करून दिला. प्रत्येक बॅच सुमारे दीड ते दोन महिन्यांत तयार होऊ लागली. वर्षातून सुमारे सात बॅचमधून खत तयार होऊ लागले. गावात जनावरांची संख्या मोठी असल्याने शेणखत मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागले. प्रकल्पाचे नाव बारदानावर छापून ५० किलो पॅकिंगमधून तयार गांडूळ खताची विक्री होऊ लागली. सुरवातीच्या काळात तीन रुपये प्रतिकिलो दराप्रमाणे ५० किलो खत १५० रुपयांना विकण्यास सुरवात केली.

व्यवसायातील महत्त्वाच्या बाबी
-सुमारे ७० ते ८० ट्रेलर शेणखताची स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी
- मजुरांना प्रशिक्षण. नियमित पाच मजुरांना रोजगार.
- बेडमध्ये शेण भरताना ते थंड असल्याची खात्री केली जाते, यामुळे गांडुळांना इजा होत नाही.
- शेण भरल्यानंतर सर्व बेड बारदाना किंवा शेडनेटने झाकून ठेवले जातात, यामुळे कुजण्याची प्रक्रिया लवकर होते.
- तयार झालेले गांडूळ खत चाळूनच गोडाउनमध्ये ठेवले जाते.
- सुटे न विकता ५० किलोच्या पॅकिंगमधून विकले जाते.
- खताचा दर्जा कायम चांगला ठेवण्याचा प्रयत्न.
- व्यवसायातील सर्व टिपणे ठेवली जातात.
- गांडूळ कल्चरचीही ४०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री
- व्हर्मिवाॅश देताना शक्यतो कोणते शुल्क घेतले जात नाही.

अर्थशास्त्र
खत, भरणी व वाहतुकीसाठी ३५ हजार रुपये, मजुरी १५ हजार रुपये, पाच हजार रुपये बारदानासाठी (पालापाचोळा घरचा असल्याने यासाठी खर्च नाही), असा प्रतिबॅचमागे सुमारे ५५ हजार रुपये खर्च येतो. प्रतिबॅचमध्ये नऊ टन गांडूळ खत तयार होते. शेणखत किंवा कच्च्या मालाचे दर वाढल्याने गांडूळ खताचे दर वाढवणे गरजेचे झाले आहे. सध्या ५० किलोची बॅग ५०० रुपये या दराने विकली जाते.

विक्री दृष्टिक्षेपात
वर्ष-------------------खतनिर्मिती--------------- दर प्रतिटन (रु.)
२०१३------------------६० टन-------------------७ हजार
२०१४------------------६० टन-------------------८ हजार
२०१५------------------६५ टन------------------८ हजार ५००
२०१६-----------------६० टन--------------------८ हजार ५००

मदत व मार्गदर्शन
किरण यांना व्यवसायात पती विष्णुपंत, मुलगा अोंकार यांची मोठी मदत होते. रामदास हिंगणे यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरले आहे. महाबळेश्र्वर, खटाव, कऱ्हाड तालुक्यांतील शेतकऱ्यांकडून खताला कायम मागणी असते. विशेष मागणी फळबागांसाठी असते. गेल्या दोन वर्षांत किंवा यंदाच्या वर्षी तर शेतमालाचे दर कमी झाल्यामुळे, नोटाबंदीमुळे गांडूळ खत मागणीवर काही प्रमाणात परिणाम झाला असल्याचे किरणताईंनी सांगितले.

घर, व्यवसाय अन् बचत गटही
घरातील सर्व कामे सांभाळून किरणताई व्यवसायही सांभाळतात. त्याचबरोबर २५ सदस्य असलेला महिला बचत गटही त्या सांभाळतात. गेल्या दहा वर्षांच्या अनुभवात अलीकडील काळात गांडूळ खताचा वापर शेतकरी मंडळी अधिक प्रमाणात करीत असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे.

Thursday, 13 April 2017

शेती शिक्षण आणि प्रशिक्षण.

पाण्याचे दुर्भिक्ष, वाळवंटी भूभागाचा मोठा पट्टा, अत्यंत कमी पाऊस अशा प्रतिकूल गोष्टींशी टक्कर देत इस्राईलने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून कृषी प्रगती साधली आहे.

इस्राईलचा शेतकरी 1000 लिटर पाण्यापासून 70 रुपये उत्पन्न मिळवितो.
पूर्वी त्यांना 1000 लिटर पाणी वापरातून 18 रुपयांचे उत्पन्न मिळत होते.
सध्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने उत्पादन चौपट वाढ झाली आहे.
इस्राईलमध्ये पावसाचे पाणी भूगर्भात साठविण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते.

या साठविलेल्या पाण्यातून देशाची 60 टक्के पाण्याची गरज भागविली जाते.
इस्राईलमध्ये भूगर्भातील पाणीसाठ्याची दोन महत्त्वाची ठिकाणे आहेत.
यामध्ये समुद्र किनाऱ्याजवळील झरे (ऍक्विफर) आणि दुसरा पर्वतीय विभागातील झऱ्यातून पाणीसाठा तयार केला जातो. याशिवाय उत्तरेकडील गोलन टेकड्या व पश्चीमेकडील किनरेट तळ्याजवळ लहान शेकडो झरे आहेत.

समुद्रकिनाऱ्याजवळील झऱ्यातून दरवर्षी सुमारे 25 कोटी घनमीटर व पर्वतीय विभागातील झऱ्यातून सुमारे 35 कोटी घनमीटर पाणी उचलले जाते. समुद्रकिनाऱ्याजवळील झऱ्यातून प्रमाणापेक्षा जास्त पाणी उचलल्यास गोड्या पाण्याची पातळी खाली जाते. त्यामुळे ऍक्विफरमध्ये खारे पाणी मिसळून क्षाराचे प्रमाण वाढते. पाणी वापरण्यायोग्य राहत नाही. झऱ्याच्या साठ्यातून उचललेल्या जादा पाण्याची योग्य पातळी राहावी म्हणून किनरेट तलावात पावसाळ्यात जादा झालेले पाणी बंदिस्त पाइपमधून झऱ्यांच्या साठ्यात सोडले जाते. अवर्षणाच्या वेळी जादा उचलले पाणी पावसाळ्यात पुनःश्‍च त्या पातळीवर आणणारा इस्राईल 
हा जगातील एकमेव देश आहे.

या दोन झऱ्याशिवाय इस्राईलमध्ये भूपृष्ठात पाणीसाठा करण्यासाठी सुमारे 2800 विहिरी असून 150 कूपनलिका आहेत. यामधील काही विहिरी व बोअरवेल्स खास अवर्षणाच्या वेळी उचललेल्या पाण्याचे हिवाळ्यात पुनर्भरण (रिचार्ज ऑफ वॉटर) करण्यासाठी ठेवल्या आहेत. या शिवाय भूपृष्ठावरील पावसाळ्यात वाहणारे पाणी वाया जाऊ नये म्हणून लहान लहान तळी व तलावांची मोठ्या प्रमाणात उभारणी केली आहे. इस्राईलमध्ये हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यात पाऊस पडतो.

2) किनरेट तलाव (सी ऑफ गॅलीली)
इस्राईलमधील गोड्या पाण्याचा एकमेव आणि मोठा तलाव जॉर्डन नदीवर नैसर्गिक खच दरीतून निर्माण झाला आहे. हा तलाव नैसर्गिकरीत्या खचलेल्या भागात म्हणजे समुद्रसपाटीपेक्षा 740 फूट खोलीवर असल्याने जॉर्डन नदीचे पाणी येथे मोठा बंधारा न बांधता साठून राहते. या तलावाची एकूण क्षमता 400 कोटी घनमीटर असून, या तलावातून दरवर्षी 50 कोटी म्हणजे देशाच्या एकूण गरजेच्या 25 टक्के पाणी वापरासाठी घेतले जाते. इस्राईलला वार्षिक सुमारे 200 कोटी घनमीटर पाणी लागते. तलावाचा संपूर्ण साठा वापरावयाचा झाल्यास या तलावाचे 
पाणी इस्राईलला दोन वर्षं पुरेल.

तथापि, बाष्पीभवनाने वाया जाणारे पाणी, तसेच पुढील वर्षी कदाचित पाऊस पडला नाही तर दुष्काळ विचारात घेऊन ते एकूण क्षमतेच्या 25 टक्के पाणी वापरले जाते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी 50 कोटी घनमीटर पाणी उचलून 350 कोटी घनमीटर पाण्याची पातळी कायम ठेवली जाते. किनरेट तलाव इस्राईलमधील पाण्याचा राखीव साठा आहे. तलावातील मर्यादित पाणी पुरवून कसे वापरावे याचे किनरेट तलाव उत्तम उदाहरण आहे. या तलावाची लांबी 21 किलो मीटर व रुंदी आठ किलोमीटर आहे.

पुनर्वापरात आणलेल्या पाण्यातून घरगुती वापर व उद्योगधंद्यांसाठी पाण्यावर सुमारे 70 टक्के प्रक्रिया करून शेतीच्या वापरासाठी दिले जाते. त्यामुळे देशाची एकूण 15 टक्के गरज भागविली जाते. इस्राईलमध्ये पुरवठा केलेल्या पाण्यापैकी 60 टक्के पाणी शेतीसाठी, दहा टक्के पाणी उद्योगधंद्यासाठी व 30 टक्के पाणी घरगुती वापरासाठी दिले जाते.

शेतीसाठी कराव्या लागणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी पाणीपुरवठा कंपनीस 1000 लिटर पाण्यास दहा रुपये इतका खर्च येतो. शेतकऱ्यांना शेतीसाठी द्यावयाच्या पाण्यास सरकारमार्फत 50 टक्के अनुदान दिले जाते.

इस्राईलचा शेतकरी 1000 लिटर पाण्यापासून 70 रुपये मिळवितो. पूर्वी त्यांना 1000 लिटर पाणी वापरातून 18 रुपयांचे उत्पन्न मिळत होते. परंतु सध्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने उत्पादनात चौपट वाढ झाली आहे. आपल्या शेतकऱ्यांनी आणि सरकारने या गणिताचा जरूर विचार करावा.

इस्राईलमध्ये शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा पीक पद्धतीनुसार कोटा ठरवून दिला जातो. ठरवून दिलेल्या कोट्याप्रमाणे शेतकऱ्यांनी पाणीपुरवठा करणे त्यास बंधनकारक आहे. तथापि, ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा जादा पाणी हवे असल्यास शासनाकडे तशी मागणी करावी लागते. शासन पाण्याच्या आवश्यकतेची खात्री करून नेहमीपेक्षा दुप्पट दराने पाणीपुरवठा करते. पाण्याच्या अशा प्रकारे प्रचंड मर्यादा असल्याने प्रत्येक शेतकऱ्याने नियोजनबद्ध रीतीने ठिबक व फवारा सिंचन पद्धतीचा पीक प्रकारानुसार 100 टक्के वापर केलेला आहे.

प्रत्येक शेतकऱ्याने आवश्‍यक शेतावर पाणीपुरवठ्यासाठी स्वयंचलित संगणक बसविला आहे. त्यामुळे शेतीस आवश्‍यक तेवढे पाणी दिले जाते. या देशात पाटाने अजिबात पाणी दिले जात नाही. पण पाणी निश्चितपणे पाहिजे त्या वेळी मिळते. नाहीतर आपणाकडे पाण्याची पाळी 15 दिवसांपासून एक महिन्यापर्यंत कशीही लांबते. याचा परिणाम प्रति एकरी उत्पन्नावर होतो.

3) फिल्टरचे तंत्रज्ञान :-
ठिबक सिंचन पद्धतीमध्ये फिल्टरला अतिशय महत्त्व आहे.
ठिबक संच बसविण्यापूर्वी पाण्याची गुणवत्ता व दर्जा कोणत्या प्रकारचा आहे हे विचारात घ्यावे लागते. इस्राईलमध्ये फिल्टरेशन तंत्रज्ञान खूप विकसित झाले आहे. त्यासाठी त्यांनी दर्जेदार, टिकावू व कार्यक्षम फिल्टर तयार केले आहेत. पाणी कितीही प्रदूषित असले तरी अतिशय वेगाने ते फिल्टरमध्ये आत घेतले जाते. आतील जाड चकत्या वेगाने फिरतात त्यामुळे स्वच्छ पाणी खाली पाइपमध्ये येते व पाण्यातील घाण फेसासारखी वरच्या भागात साठविली जाते व ठराविक वेळेला विरुद्ध दिशेकडून पाण्याचा प्रवाह येऊन घाण व्हॉल्व्हद्वारे बाहेर टाकली जाते व फिल्टर आपोआप साफ केला जातो.

4) ड्रीपरचा वापर :-
इस्राईलमध्ये ठिबक संच तयार करता असताना तो सहज, सुलभ वापरायोग्य व कमीत कमी देखभाल लागेल असे तयार केले जातात. पाइपच्या बाहेर ड्रीपर असल्यास ते पाइप शेतात अंथरताना किंवा काढताना मोडण्याची, तुटण्याची शक्यता असते. कारण इस्राईलमध्ये पाइप टाकणे किंवा परत गोळा करणे ही कामे यंत्रामार्फतच केली जातात. याकरिता त्यांनी इनलाईन ड्रीपर पद्धती शोधून काढली आहे. इस्रायली कंपनीने एका विशिष्ट प्रकारच्या ड्रीपरची निर्मिती केली असून पाणी देणे बंद केल्याबरोबर ड्रीपरमधून पाणी बाहेर पडण्याचे थांबते.
त्यामुळे पाइपमधीलही पाणी वाया जात नाही किंवा पिकास जास्त दिले जात नाही.
या तंत्रामुळे पाण्याची लक्षणीय बचत होते कारण ग्रीन हाऊसमध्ये पिके वेगवेगळ्या माध्यमांमध्ये घेतली जातात. पिकाच्या योग्य वाढीकरिता दिवसातून बऱ्याच वेळेला पाण्याचा वापर केला जातो. काही कंपन्यांनी एका वेळी 18 x 18 मीटर एवढ्या अंतरावरील पिकांना पाणी देता येईल असे तुषार संच बनविलेले आहेत. ठिबक सिंचनातून इस्राईलने अतिशय नेत्रदीपक प्रगती केलेली आहे. हजारो एकर फळबागा, फुलशेती, स्ट्रॉबेरीची शेती, ठिबक सिंचनावर डोलताना बहरताना दिसून आल्या. एवढेच काय त्यांनी रस्त्यावरील झाडांना, विमानतळावरील हॉटेलसमोरील लहान लहान झाडांनासुद्धा ठिबकनेच पाणी दिले आहे. याउलट आपण ठिबक सिंचनामध्ये म्हणावी तशी प्रगती करू शकलो नाही. कारण आपल्याकडील शेतकऱ्यांना अद्यापही ठिबक पाणी पद्धतीचे महत्त्व पटलेले नाही.

पाणी व्यवस्थापनाच्या फवारा पद्धतीमध्ये कायम स्वरूपी फवारा, फिरता फवारा, 
गन फवारा, गन फवारा, कमी दाबाचा फवारा, वैयक्तिक झाडापुरता छोटा फवारा, एका विशिष्ट दिशेने फिरणारा फवारा असे वेगवेगळे प्रकार असून एका वेळी 160 एकरांपर्यंत गोलाकार क्षेत्र फिरून भिजविणारा फवारा सिंचन हे येथील खास वैशिष्ट्य आहे.

मुख्य पाइपवर बसविलेल्या तोट्यांच्या साह्याने पाणी सभोवार पिकावर फवारले जाते. हा फवारा संच शेतात कायमस्वरूपी बसविलेला असतो. मोटारच्या किंवा ट्रॅक्‍टरच्या साह्याने हा संच मागे पुढे पाहिजे त्या प्रमाणे हलविता येतो.
सदरचा संच एका बाजूला स्थिर ठेवलेला असतो व दुसरी बाजू गोलाकार फिरून शेतामधील पिकास फवारा पद्धतीने पाणी दिले जाते. आपल्या राज्यात पाण्याच्या नियोजनाबाबत भरपूर करता येणे शक्य आहे.

इस्राईलच्या गोलन टेकड्या व उत्तरेकडील वातावरण आपल्या महाराष्ट्रातील कोकण विभाग, थंड हवेची ठिकाणे व डोंगरी भागातील वातावरणाशी काही प्रमाणात मिळते जुळते आहे. इस्राईलमध्ये उत्तरेकडे पाऊस 700 मि.मी. तर आपल्या या भागात 3000 ते 4000 मि.मी. एवढा प्रचंड पाऊस पडतो.
असे असूनही पावसाळ्यात जास्त पाऊस पडणाऱ्या या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते.

राज्यातील दुष्काळसदृश तालुक्यात वार्षिक 500 ते 600 मि.मी. एवढा पाऊस पडतो. याउलट इस्राईलमध्ये जास्त पाऊस पडणाऱ्या विभागात 600 ते 700 मि.मी. पाऊस पडत असूनही केवळ पाणी अडविण्याच्या व जिरविण्याच्या प्रभावी मोहिमेमुळे व पाण्याच्या नियोजनामुळे वर्षभर देशास पाणीपुरवठा करणे त्यांना शक्‍य झाले आहे.

5) संगणक नियंत्रित ठिबक आणि फवारा सिंचन :--
इस्राईलमध्ये सिंचन पद्धतीबाबत अतिशय सखोल अभ्यास करून संगणक नियंत्रित ठिबक व फवारा सिंचन पद्धतीचा वापर सुरू केला आहे. सिंचन व्यवस्थेकरिता इस्राईलच्या शास्त्रज्ञांनी प्रत्येक झाडाचे वैशिष्ट्य शोधून काढले आहे. त्याच्या वयोमानाप्रमाणे तसेच जमिनीची प्रत, हवामान या सर्व बाबींचा बाराकाव्याने अभ्यास करून त्या झाडास पाणी किती व कधी लागेल त्या सर्व बाबी ठरविण्यात आल्या. त्याची सर्व माहिती संगणकास पुरवून ठिबक सिंचनाचा संच संगणकास जोडला जातो.

या संगणकाद्वारे पिकास आवश्यक तेवढेच व आवश्यक वेळी पाणी दिले जाते.
ठिबक सिंचनाचा वापर करताना पाण्याच्या प्रत्येक थेंबाच्या जाडीचाही त्यांनी विचार केला आहे. एखाद्या झाडास साधारणपणे आठ तासात किती पाणी लागते, त्यासाठी किती जाडीचा थेंब व किती वेगाने तो ड्रीपरमधून बाहेर पडावा अशा प्रकारचे त्या ड्रीपरला छिद्र पाडली जातात.

ठिबक सिंचन पद्धतीद्वारे द्रवरूप खते झाडाच्या मुळाजवळच दिली जातात. त्यामुळे खतांचा अपव्यय टाळून त्यांचा योग्य मोबदला मिळतो. रिमोट कंट्रोल 
बसविलेले संगणक हे काम माणसापेक्षा अतिशय बिनचूक व चांगल्या पद्धतीने करत असल्यामुळे संगणकाद्वारे पाण्याचे व्यवस्थापन करणाऱ्या काही संस्था इस्राईलमध्ये निर्माण झाल्या आहेत.

6) संगणक वापराचे फायदे :--
1) संगणक नियंत्रित पद्धतीत पिकांना पाणीपुरवठा दररोज ठराविक वेळेला व ठराविक कालावधीसाठी पिकाचे त्या दिवशीच्या आवश्‍यकतेनुसार केला जातो.
त्यामुळे पाण्याची बचत होऊन उत्पादनवाढीस मदत होते.

2) संगणक पिकांना नियमित व अखंडपणे पाणीपुरवठा करत असताना आवश्‍यकतेनुसार व्हॉल्व्ह (झडपा) बंद व चालू करणे इ. कामे करतो.
पिकाचा प्रकार, मातीचे गुणधर्म व त्या दिवशीचे असणारे हवामान, पाण्याची गळती, पाणी वाहण्याची गती, वीजपुरवठा या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवून आवश्यक तेवढेच पाणी देतो.

3) संगणकामुळे खते योग्य प्रमाणात व योग्य वेळी दिली जाऊन त्यांची कार्यक्षमता वाढविता येते. पाणी व खते एकाचवेळी दिल्यास पिकास आवश्‍यक अन्नद्रव्य योग्य प्रमाणात मिळतात. पाण्यातून खते देता यावीत यासाठी इस्राईलमध्ये सर्व प्रकारची खते द्रवरूप तयार केली जातात.

4) काही तांत्रिक दोषामुळे जास्त दाबाने पाणी आल्यास व त्यामुळे काही ठिकाणी पाइप फुटून पाणी वाहू लागल्यास संगणकाद्वारे त्या ठिकाणचे व्हॉल्व लगेच बंद केले जातात. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत नाही.