Thursday 7 December 2017

पैशाचे नियोजन2

पैसा वसे मनी…
भाग ०२ – नियोजन आणि महत्त्व
------------------------------------------
११.१ पैशाची निर्मिती
-----------------------------------------
पैशातून पैसे मिळवण्यासाठी किंवा पैशाची योग्य गुंतवणूक करुन त्यात वाढ करण्यासाठी पैशाच्या झाडाबाबत आपण माहिती करुन घेतले. त्यात आपल्याला असे आढळून आले की, पैशाची निर्मिती करण्यासाठी पैसेच पेरावे लागतात. मग मुळात पेरण्यासाठी पैसे आणायचे कुठून? तर आपण प्रत्येकजण पैसा कमावतो. त्याचे अनेक मार्ग आपल्याला माहिती असतात. काहीजण नोकरीतून पैसा कमावतात, काहीजण व्यवसायातून पैसा कमावतात, काहीजण अन्य काही मार्गाने पैसे कमावतात/ मात्र कमावलेले पैसे एवढ्या लवकर खर्च होऊन जातात की, बचत किंवा गुंतवणूक करण्यासाठी अजून पैसा आणायचा कुठून? काहीजणांना हा प्रश्न पडतो. बऱ्याचजणांकडे तुटपुंजे उत्पन्न असते. अशावेळी अजून पैसा कमावला पाहिजे ही इच्छा मनात घर करुन बसते. प्रत्येक माणसाला भरपूर पैसे कमवावे ही इच्छा असते. बहुतांश लोक त्यासाठी प्रयत्न करत नाहीत किंवा त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दिशा चुकते. योग्य दिशेचा किंवा मार्गांचा शोध घेण्याऐवजी चुकीच्याच दिशेने कित्येक वर्षे काम करत राहतात. तेव्हा नवीन मार्गाचा शोध घेतला पाहिजे. आहे त्या पैशाचे सुध्दा योग्य नियोजन केले पाहिजे. हे नियोजन कसे करायचे ते आपण उद्या पाहू या.

त्याआधी एक गोष्ट सांगतो, म्हणजे आपल्याला पैशाची निर्मिती करताना कोणत्या मार्गाचा अवलंब करायला पाहिजे त्याचा अंदाज येईल. एका शेतकऱ्याची बायको धान्य निवडत बसलेली असते. त्यावेळी एक माणूस जवळून चाललेला असतो. त्याचा व शेतीचा दूरदूर पर्यंत संबंध नसतो. त्याला धान्य निवडण्याचे काम पाहण्याचे कुतूहल निर्माण होते. ती शेतकऱ्याची बायको फुटके, बारीक दाणे एका बाजूला काढते. चांगले, मोठे टपोरे दाणे दुसऱ्या बाजूला काढते. अशी विभागणी केल्यावर चांगले टपोरे दाणे ती व्यवस्थितपणे जपून ठेवते. फुटक्या व बारीक दाण्यांना दळण्यासाठी काढते. मग तो माणूस त्या शेतकऱ्याच्या बायकोला प्रश्न विचारतो, “या चांगल्या, मोठ्या टपोऱ्या दाण्याचे काय करणार? आणि या लहान, फुटक्या दाण्यांचे काय करणार?” ती भोळी शेतकरीण त्याला सहज उत्तर देते. “या फुटक्या दाण्यांना दळून त्याची भाकरी करणार. माझ्या मुलांना व नवऱ्याला तसेच मला खाण्यासाठी ही भाकरी उपयोगात येईल” मग तो माणूस म्हणतो, “या मोठ्या टपोऱ्या दाण्यांचे काय करणार?” त्यावर शेतकऱ्याची बायको म्हणते, “हे दाणे आम्ही रानात नेऊन टाकणार.” त्यावर तो माणूस मनातल्या मनात हसतो आणि विचार करतो काय ही वेडपट बाई आहे. फुटक्या दाण्याची भाकरी करुन आपल्या मुलांना व नवऱ्याला घालणार आणि चांगले दाणे मातीत टाकणार. त्याला राहवत नाही, म्हणून तो तिलाच विचारतो, “हे चांगले, मोठे टपोरे दाणे रानात नेऊन टाकणार म्हणजे मातीतच टाकणार. त्याचा काय फायदा? त्याउलट तुमच्या जागी मी असतो तर चांगले मोठे टपोरे दाणे दळून त्याची भाकरी करुन खाल्ली असती, अन् हे फुटके व बारीक दाणे मातीत फेकून दिले असते.” आता शेतकरीण मनातल्या मनात हसते व त्याला म्हणते, “साहेब तुम्ही लय शिकलेले दिसता. फुटके दाणे रानात टाकल्यावर उगवून येत नाहीत. आज चांगल्या दाण्याची भाकरी करुन खाल्ली तर उद्या कुठे जायचे? काय खायचे? त्याउलट आज फुटक्या दाण्याची भाकरी करुन खाल्ली व चांगले दाणे रानात पेरले तर त्यातून काही महिन्यांनी भरपूर धान्य येईल. मग त्याच्या पाहिजे तेवढ्या भाकरी करुन खाता येतील.” त्याला जे काही समजायचे ते समजते, तो निघून जातो.

आपल्याला या गोष्टीवरुन हा बोध घ्यावा लागेल की, आपल्या उज्ज्वल उद्यासाठी काही पैशांची गुंतवणूक केल्यास त्यातून जर आपले आयुष्य दीर्घकाळासाठी सुखी व आरामदायी होणार असेल तर आपल्याकडे असलेल्या पैशातून नियोजन केले पाहिजे. आजच खाण्याच्या नादात उद्याची उपासमार होणार असेल, तर आजच्या खाण्यात बदल करुन उद्यासाठी नियोजन करणे महत्त्वाचे असते. हे करत असताना अजून एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे असते. उद्या काहीतरी चांगले होईल म्हणून आजच्या आयुष्याचा मोठ्या प्रमाणात विध्वंस करु नये. थोडा सारासार विचार करुन गुंतवणूक व नियोजन करण्याबरोबरच आजच्या जीवनाचा सुध्दा आनंद घेतला पाहिजे. धन्यवाद.

- अमोल चंद्रकांत कदम, संपादक, नवी अर्थक्रांती
#rich #money #पैसा #गरीब #श्रीमंत #मनी #गुंतवणूक #Investment #FinancialPlanning

Wednesday 6 December 2017

पैश्याचे नियोजन 1

पैसा वसे मनी…
भाग ०२ – नियोजन आणि महत्त्व
------------------------------------------
११. पैशाची निर्मिती
-----------------------------------------
‘पैसे झाडाला लागत नाहीत’, अशा अर्थाची अनेक वाक्ये आपल्याला नेहमी ऐकू येत असतात. मान्य आहे की पैसे कुठल्या भौतिक झाडांना प्रत्यक्षपणे लागत नाहीत, मात्र प्रत्येक झाडाची व्यवस्थित लागवड केली, त्याला खत, पाणी, निरोगी हवा व स्वच्छ सूर्यप्रकाश यांचा योग्य प्रमाणावर पुरवठा केला, तर ती झाडे आपल्याला पैसे मिळवून देतात; मग ती झाडे वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. त्यात आंबा, नारळ, कापूस, ऊस, तुरी, बाजरी किंवा अगदी वेड्या बाभळीच्या झाडांचा सुध्दा समावेश होतो, मात्र ज्या झाडांना थेट पैसे लागतात अशा झाडांची माहिती या लेखात आहे.

आतापर्यंत आपण पैशाबद्दल असणारे समज व गैरसमज, वास्तव, अपेक्षा याबाबत माहिती पाहिली. समृध्दी प्राप्तीच्या वाटा माहिती करुन घेतल्या, मात्र पैसा हा संपत्ती व समृध्दी प्राप्ती करण्यासाठी लागणारा मुख्य घटक आहे. मग हा मुख्य घटक निर्माण करायला शिकले पाहिजे.

आता पैशाचे झाड लावण्याची प्रक्रिया पाहू या. आंब्याचे झाड लावण्यासाठी आंब्याची कोय (बाठ), सफरचंदाचे झाड लावण्यासाठी सफरचंदाचे बीज गरजेचे आहे. कारण निसर्गाचा नियम आहे, ज्या प्रकारचे बी तुम्ही पेराल त्याच्या अनेकपट फळे ते झाड तुम्हाला देते. त्यासाठी अटी लागू असतात. आज झाड लावले की, उद्या लगेच फळे लागत नाहीत. त्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागतो. त्यासाठी बी पेरण्याआधी चांगली मशागत केलेली शेतजमीन, बी पेरल्यानंतर ठराविक काळानंतर खत, पाणी, संरक्षण, शुध्द हवा, स्वच्छ सूर्यप्रकाश या घटकांचा पुरवठा करावा लागतो. मध्ये पिकावर रोग पडला तर फवारणी करुन कीटकांचा नाश करावा लागतो. नको असणारे व पिकांच्या वाढीसाठी अडथळा निर्माण करणारे गवत काढावे लागते. त्यानंतर ही फळे लागतात. फळे पिकेपर्यंत त्याची राखण करावी लागते. त्यानंतर ती खाण्याचा किंवा बाजारात नेऊन विकण्याचा व त्यातून पैसे मिळवण्याचा आनंद घेता येतो.

वरीलप्रमाणेच पैशाचे झाड लावण्यासाठी पैसेच पेरावे लागतात. थोडे पैसे पेरले की त्यातून अनेकपट पैसे निर्माण करता येतात. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. सुपीक जमिनीची निवड करणे म्हणजेच पैसा गुंतवणूकीसाठी योग्य माध्यमांची निवड करावी लागते. कधीकधी त्यात थोडाफार बदलसुध्दा करावा लागतो. प्रत्यक्षातील संधीचा आढावा घ्यावा लागतो. पैसा वाढवताना येणाऱ्या अडचणी दूर कराव्या लागतात. वेळोवेळी नियोजनाचे पुनरावलोकन करावे लागते. मग योग्य वेळी उत्तम पैसे आपल्याला प्राप्त होतात. पैशाची वाढ करण्यासाठी पैशाच्या गुंतवणुकीचे झाड लावावे लागेल. नियोजनाचे खतपाणी द्यावे लागेल.

हे सगळं करण्यासाठी मुळात थोडाफार तरी पैसा आपल्याकडे असला पाहिजे. नसला तर तो कमावला पाहिजे. त्यानंतर त्याची बचत केली पाहिजे. हळूहळू बचतीकडून गुंतवणूकीकडे वाटचाल झाली पाहिजे.

हे लावलेले पैशाचे झाड किती दिवसात किती पट पैसा देऊ शकेल याचा अंदाज आपल्याला बांधता यावा म्हणून अजून एक शेतीचे उदाहरण पाहू या.
ज्याला आठवडाभरात किंवा पंधरा दिवसात पीक पाहिजे असते तो शेतकरी कोथिंबीर लावतो. ज्याला महिन्या दोन महिन्यात पीक पाहिजे तो शेतकरी पालेभाज्या लागवड करतो. ज्याला चार ते सहा महिन्यांनी पीक पाहिजे असा शेतकरी ज्वारी, बाजरी, कांदे, मका, गहू यासारखी पिके घेतो. ज्याला वर्षभरात पीक पाहिजे तो ऊस किंवा बटाटा यांची शेती करतो. ज्याला दोन ते अडीच वर्षांनी पाहिजे तो लिंबू किंवा इतर पिके घेतो. ज्याला पाच वर्षात पीक हवे असते तो आंब्याची, नारळाची झाडे लावतो. कोथिंबीरीच्या तुलनेत पालेभाज्या, ज्वारी, ऊस हे चढत्या क्रमाने जास्त नफा मिळवून देतात. लिंबू व आंबे यासारखी वृक्षरुपी पिके एकदाच लागवड करुन अनेक वर्षे उत्पादन देतात. त्याचप्रमाणे पैशाच्या गुंतवणुकीची अनेक माध्यमे आहेत. काही अल्पमुदतीची आहेत तर काही दीर्घमुदतीची आहेत. काही मध्यम मुदतीची आहेत. काही माध्यमात जोखीम (risk) जास्त व परतावा (returns) चांगला आहे, तर काही माध्यमात जोखीम व परतावा कमी आहे. काही माध्यमात गुंतवणुकीचे पैशात रुपांतर करायला जास्त वेळ लागतो, तर काही माध्यमात हा वेळ कमी प्रमाणात लागतो. अशा सगळ्या गुंतवणुकीच्या माध्यमांची ओळख व माहिती पुढे करुन घेऊ या. धन्यवाद.

- अमोल चंद्रकांत कदम, संपादक, नवी अर्थक्रांती
#rich #money #पैसा #गरीब #श्रीमंत #मनी #MoneyPlant #पैशांचेझाड

Sunday 3 December 2017

अर्थक्रांती भाग 9.1

पैसा वसे मनी…
भाग ०१ – पैसा गरज, अपेक्षा, वास्तव, समज व गैरसमज
------------------------------------------
०९. संपत्तीतून समृध्दीकडे
------------------------------------------
बिल गेट्स यांच्याबद्दल समजलेली एक गोष्ट. बिल गेट्स एकदा एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. जेवण झाल्यावर त्यांनी बिल दिले. त्यानंतर वेटरला ५ डॉलर टीप म्हणून दिले. तेव्हा तो वेटर म्हणाला, “तुमचा मुलगा इथे ज्यावेळेस जेवायला येतो तेव्हा ५०० डॉलरची टीप देतो. तुम्ही तर त्याचे वडील आहात. जगातील सर्वात श्रीमंत माणूस असून देखील तुम्ही केवळ ५ डॉलरची टीप दिली हे पाहून आश्चर्य वाटले.” त्यावेळी बिल गेट्स यांनी दिलेले उत्तर आपल्या खूप काही शिकवून जाते. बिल गेट्स त्या वेटरला म्हणाले, “मित्रा जो तुला ५०० डॉलरची टीप देतो. त्याचा बाप जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे, मात्र मी जेव्हा टीप देतो. तेव्हा मला याची जाणीव असते की, माझा बाप एक सामान्य शेतकरी आहे.” याचा अर्थ ज्यांचे वडील श्रीमंत आहेत, त्यांनी पैसा उधळावा किंवा पाहिजे तसा खर्च करावा असा घेऊ नये, तर आपल्याला पैसा खर्च करताना सामान्य गरजांचा किंवा त्याच्या उपयोगितेचा विचार करुन केला पाहिजे याची जाणीव सतत असणे गरजेचे आहे.

बऱ्याच लोकांचा असा समज असतो की, आपण एकदाच भरपूर पैसे कमावले की, मग आयुष्यभर पैसे कमवण्याची आवश्यकता नाही किंवा काही लोक सतत पैसे कमावण्याचा ध्यास (म्हणण्याऐवजी हव्यास म्हणेन) घेऊन जगत असतात. त्यांना वाटत असते की आता आपण एवढे पैसे कमावून ठेऊया, ज्यामुळे येणाऱ्या कित्येक पिढ्या बसून खातील. त्यांना काही काम करावे लागणार नाही. मात्र हा समज निव्वळ पोकळ असल्याचे आपल्या लक्षात येईल; कारण वाढत जाणारा महागाई दर व पैशाचे कमी होणारे मूल्य याचा अंदाज घेतला तर आपल्याला समजून येईल की, १९४७ साली १०००० रुपये ही खूप मोठी संपत्ती होती. त्यावेळी १०००० रुपयात एका सामान्य माणसाला आयुष्यभर लागणाऱ्या सर्व वस्तू खरेदी करता येत होत्या. सत्तर वर्षानंतर म्हणजे तीन पिढ्यानंतर १०००० रुपयात एका सामान्य माणसाचे घर एक महिना कसेबसे चालते. हा पैशाच्या मूल्यातील फरक आहे. ज्या माणसाने त्या काळात काही लाख अथवा काही करोड रुपये आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी ठेवले असतील, तर ते पैसे दोन ते तीन पिढ्यांनाच पुरले नसते. या समस्येचे उत्तर किंवा कायमस्वरुपी श्रीमंतीची रहस्ये म्हणजेच समृध्दी प्राप्त करण्याचे रहस्य जाणून घेण्याआधी बिल गेट्स यांची अजून एक गोष्ट सांगतो.

बिल गेट्स यांचे पैशाबाबतचे विचार अतिशय उत्तम आहेत. ते सामान्य माणूस ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. त्यांनी कमावलेल्या संपत्तीतील बहुतांशी भाग (९० टक्क्याहून अधिक संपत्ती) ही दान करण्याचे ठरवले आहे. उरलेली संपत्ती सुध्दा ते आपल्या मुलांना देण्याऐवजी कंपनीला देणार आहेत. जेणेकरुन कंपनी सुरळीतपणे चालेल. मुलांसाठी कोणतीही संपत्ती ते पाठीमागे ठेवणार नाहीत. त्यावर त्यांचे विचार असे आहेत की, “मी सामान्य कुटुंबातून वर येऊन एवढी संपत्ती कमावू शकतो तर माझ्या मुलांना ती संपत्ती कमावण्याचे मार्ग मी सांगेन. कमावलेली आयती संपत्ती त्यांच्या हातात देणार नाही. त्यांना त्याचे पराक्रम किंवा ओळख निर्माण करण्याची गरज निर्माण झाली पाहिजे. ती कला त्यांना अवगत असली पाहिजे. त्यासाठी त्यांना हवे ते उत्तम शिक्षण प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करुन देईन. त्यातून ते सुध्दा त्यांना हवी तेवढी संपत्ती निर्माण करतील.”

या गोष्टीला समांतर अशी एक म्हण आहे. ती म्हणजे, ‘एखाद्याला एकवेळचे अन्न देण्यापेक्षा त्याला अन्न मिळवण्याची कला शिकवणे कधीही उत्तम’ किंवा एखाद्याला मासा देण्याऐवजी मासेमारी शिकवणे अधिक उत्तम. त्याचप्रमाणे येणाऱ्या पिढीच्या हातात पैसा देण्याऐवजी पैसे मिळवण्याचे तंत्र किंवा रहस्ये देणे अतिशय उत्तम असते. मारवाडी माणूस आपल्या मुलाला व्यवसाय कसा करायचा त्याची रहस्ये समजावून सांगतो, त्यामुळे प्रत्येक मारवाड्याकडे उत्तम पैसे असतात. भारतभरातील प्रत्येक राज्यात प्रत्येक गावात जाऊन या मारवाडी लोकांनी त्यांच्या लघुद्योगातून पैसा निर्माण केला आहे. मारवाडी समाजात शिक्षणाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी सुध्दा त्यांना व्यावहारिक ज्ञानाचा व व्यावसायिक शिक्षणाचा अभाव निर्माण होत नाही, ते त्यांना घरातूनच दिले जाते. उद्या या संपत्तीतून समृध्दीकडे जाणाऱ्या वाटा जाणून घेऊ. धन्यवाद.

- अमोल चंद्रकांत कदम, संपादक, नवी अर्थक्रांती
#rich #money #पैसा #गरीब #श्रीमंत #मनी #BillGates #बिलगेट्स #Business

Saturday 2 December 2017

,अर्थक्रांती भाग 9

पैसा वसे मनी…
भाग ०१ – पैसा गरज, अपेक्षा, वास्तव, समज व गैरसमज
------------------------------------------
०८. श्रीमंतीच्या वाटेवर
------------------------------------------
पैसे कमावणे हा वेगळा भाग आहे, त्याचे व्यवस्थापन व गुंतवणूक करणे हा एक वेगळा भाग आहे. तर पैसा कमावण्याबद्दल आपण याआधी जाणून घेतले आहे. आज पैशाचे व्यवस्थापन कसे करायचे व पैशाची गुंतवणूक करुन अधिक पैसा कसा कमवायचा हे आपल्याला जाणून घ्यावे लागेल. विजयपथ सिंघानियाचे नाव ऐकल्यावर बऱ्याच जणांना पैशाचे व्यवस्थापन तसेच ते वापरण्याचे अधिकार याबाबतची महत्त्वपूर्णता जाणवेल. विजयपथ सिंघानिया यांच्यासारखा अतिशय हुशार, व्यवस्थापनात तरबेज व अतिशय धाडसी माणूस. त्यांनी अब्जावधी रुपयांचा व्यवसाय केला म्हणजे त्यांच्याकडे व्यवस्थापनाचे ज्ञान होते, मात्र ते ज्ञान वापरताना एका ठिकाणी चूक झाली. अशी एक चूकही महागात पडू शकते. त्यामुळे पैशाचे व्यवस्थापन व त्याची गुंतवणूक करताना नेहमी सजग असले पाहिजे.

किती पैसे कमवावेत? कमावलेल्या पैशातील किती पैसे खर्च करावेत? किती पैसे गुंतवावेत? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या. आपल्या सर्व आर्थिक गरजा (हव्यास किंवा इच्छा नाही) पूर्ण होतील किमान एवढा पैसा कमावणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यापेक्षा किती अधिक पैसा कमवायचा हे ज्याचे त्याने ठरवावे. त्याला कोणतीही उच्च मर्यादा नाही. कमावलेल्या पैशाची विभागणीचे एक उत्तम सूत्र पुढीलप्रमाणे आहे.

कमावलेल्या एकूण पैशातील दहा टक्के गुंतवणूक ही आपले ज्ञान वाढवण्यासाठी करावी. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षणक्रम, कार्यशाळा, व्यक्तिमत्व विकास शिबीरे व पुस्तके खरेदी करणे अशा अनेक गोष्टींचा समावेश करता येतो. तुमचे जेवढे वय आहे. त्यानुसार बचत अथवा भविष्यकालीन गुंतवणूक करण्याचे एक सूत्र आहे. ते सूत्र आपण उद्या जाणून घेऊ या. जसजसे वय वाढत जाईल तसतसे बचत अथवा भविष्याकालीन गुंतवणूक वाढवत गेले पाहिजे हे लक्षात घ्यावे.

त्यानंतर किती पैसे खर्च करावेत? हा प्रश्न येतो. पैसे खर्च करताना आपण स्वतःला नेहमी एक प्रश्न विचारला पाहिजे, तो प्रश्न म्हणजे ही आपली गरज आहे; का आपली इच्छा आहे. बऱ्याच वेळा सुपर मार्केट किंवा ऑनलाईन खरेदी करताना आपण सवलत किंवा स्वस्तात उपलब्ध असतात म्हणून आपण आपल्याला गरज नसलेल्या कितीतरी निरुपयोगी वस्तू खरेदी केलेल्या असतात. खरेदी केल्यापासून एकदाही न वापरलेल्या कितीतरी वस्तू तशाच धूळ खात पडलेल्या आपल्याला दिसतील. अशा वस्तू अथवा सेवा आपण खरेदी करायच्या आधी विचार केला असता, तर तेवढे पैसे आपल्याला इतर ठिकाणी उपयोगी आणता आले असते. सुखवस्तू आयुष्य जगले पाहिजे. इच्छा किंवा मनाला आनंद देणाऱ्या वस्तू सुध्दा खरेदी केल्या पाहिजेत, मात्र त्याचा अतिरेक व्हायला नको इतकेच.

पुढचा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे पैशाची गुंतवणूक कुठे करावी? एक लक्षात घ्या. एकटा माणूस कितीही धावला तरी मोठ्या प्रमाणात पैसा कमावू शकत नाही. धावण्याला पण मर्यादा आहेत. काम करुन पैसा कमावला पाहिजे; मात्र नुसते काम करुन पैसा कमावत राहिलो, तर प्रत्येक माणसाची काम करण्याची क्षमता ठराविक कालावधीनंतर क्षीण होत जाते. चाळीस वर्षाचा माणूस आठ ते चौदा तास काम करु शकतो. ७० वर्षाच्या माणसाला तेवढा वेळ काम करता येईलच असे नाही. काम करण्याची क्षमता कमी होऊ शकते, मात्र आयुष्यातील पैशाची गरज जिवंत असेपर्यंत असतेच. उतारवयात आरोग्यासाठी अधिकची पैशाची गरज निर्माण होऊ शकते. उमेदीच्या काळात शारीरिक श्रमाने कमावलेले पैसे अशा ठिकाणी गुंतवले पाहिजेत की, त्यामुळे त्याचा उपयोग आपल्याला येणाऱ्या भविष्यात झाला पाहिजे. माणूस काम स्वतः काम करुन पैसे कमावतो. त्याला Active income म्हणतात. जिथे पैशाने पैसा कमावला जातो त्याला Passive income म्हणतात. काम न करता पैसे येण्याचे मार्ग (गाडी, घर, शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा अन्य) निर्माण करत जावे. कामातून निवृत्त व्हायच्या आधी आपले Passive income हे Active income पेक्षा जास्त झालेले असावे. निवृत्त अर्थात रिटायर झाल्यावर Active income थांबले तरी Passive income त्याची जागा भरुन काढते. आपल्या आयुष्यात सतत पैसे येत राहतील.

- अमोल चंद्रकांत कदम, संपादक, नवी अर्थक्रांती
#rich #money #पैसा #गरीब #श्रीमंत #व्यवस्थापन #MoneyManagement #Investment

Friday 1 December 2017

अर्थक्रांती भाग 8

पैसा वसे मनी…
भाग ०१ – पैसा गरज, अपेक्षा, वास्तव, समज व गैरसमज
------------------------------------------
८.१ श्रीमंतीच्या वाटेवर
------------------------------------------
एका शाळेत मुलांना गरीबीविषयी निबंध लिहायला लावला. त्यात एका विद्यार्थ्याने गरीबी काय असते ते कधीच अनुभवलेले नसते. तो विद्यार्थी निबंध लिहतो की – एक माणूस अतिशय गरीब असतो. त्याच्याकडे कामाला असणारे नोकरचाकर सुध्दा गरीब असतात. त्याचा कार ड्रायव्हर सुध्दा गरीब असतो. त्यांनी विकत आणलेल्या कुत्र्यांना शिळा ब्रेड खावा लागतो. त्याची बायको तिच्या नोकरांना अर्धाच पगार देत असते. त्याच्या बंगल्यात पाणी मारण्यासाठी पाईप सुध्दा लहान असते. त्यांच्याकडे झोपायला असणारी गादी व बेड जुने झालेले असतात. जेवण बनवणारा सुध्दा गरीबच असतो. अशा पध्दतीने तो मुलगा निबंध पूर्ण करतो, कारण त्याच्या गरीबीच्या कल्पनेत सुध्दा श्रीमंती असते. तशी श्रीमंतीची लक्षणे आपल्यात भिनली, की आपण श्रीमंतीच्या वाटेवर प्रवास करु लागतो.

जशी गरीबीची व गरीबाची काही लक्षणे असतात. तशी ती श्रीमंताची व श्रीमंतीची सुध्दा असतात. एकदा आपल्याला श्रीमंतीची लक्षणे माहिती झाली आणि त्याप्रमाणे वागले तर निश्चितच आपला प्रवास श्रीमंतीच्या वाटेवर व्हायला लागतो. आधी श्रीमंतीची लक्षणे येतात, मगच गरीब असलेला माणूस श्रीमंत होतो. त्यामुळे आपल्याला श्रीमंतीची लक्षणे जाणून घ्यावी लागतील, मग ती आचरणात आणावी लागतील.

श्रीमंताची लक्षणे जाणून घेऊ या, मग श्रीमंतीची लक्षणे जाणून घेऊ या. ज्याच्याकडे खायला पोटभर अन्न आहे. राहायला चांगले घर आहे, मग ते भाड्याचे का असेना (त्याचे भाडे भरण्याएवढे पैसे त्याच्याकडे कायम असतात.) चालेल; उत्तम आरोग्य आहे. मुलांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे शिक्षण देणे शक्य आहे, म्हातारपणी रिटायरमेंटची व्यवस्था करुन ठेवलेली आहे; म्हणजेच रिटायर झाल्यावर दरमहा किमान खर्चापुरते पैसे येण्याची व्यवस्था करुन ठेवलेली आहे. गरज असल्यास दुचाकी व चारचाकी गाडी ज्याच्याजवळ आहे. आपल्या इच्छित स्थळी फिरायला जाता येते. आपल्याला आवडणारी पुस्तके किंवा ज्ञान मिळवण्याची साधने खरेदी करता येतात. जीवनातील गरजेच्या वस्तू खरेदी करता येतात. विनाकारण होणारे शारीरिक कष्ट कमी अथवा दूर करता येतात. अशी आणखीही काही श्रीमंताची लक्षणे आहेत.

जशी श्रीमंताची काही लक्षणे असतात. तशीच श्रीमंतीची सुध्दा काही लक्षणे असतात. पैशावर प्रचंड प्रेम असणे किंवा जीवनातले पैशाचे महत्त्व योग्य रितीने समजावून घेतल्यामुळे पैशाचा तिरस्कार न करता तो मिळवण्याचे प्रयत्न करणे, त्यासाठी प्लॅन तयार करणे, गरजेच्या वस्तू खरेदी करणे, त्यापासून होणारे लाभ वेळीच मिळवणे. श्रमाच्या बदल्यात पैसे देऊन काम करुन घेणे, पैशाच्या माध्यमातून पैसे निर्माण करणे, श्रीमंत लोकांमध्ये वावरणे, श्रीमंतासारखे वागणे, गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीशी चांगली वागणूक ठेवणे, गरीबीचा तिटकारा असणे, गरीबाबद्दल थोडासुध्दा द्वेष मनात न बाळगणे, पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे, सर्व गुंतवणुकीचा व्यवस्थात रेकॉर्ड ठेवणे, विचार करुन पैसे खर्च करणे, खिशात, पाकिटात व बँकेत कायम पैसे शिल्लक असणे. नवीन गोष्टी शिकण्यासाठी सदैव तयार असणे, नातेवाईकांसोबत चांगले वागणे ही श्रीमंतीची लक्षणे आहेत. आपल्यामध्ये सध्या असणारी गरीबीची लक्षणे दूर करुन श्रीमंतीची लक्षणे अंगीकारण्याचा प्रयत्न करणे. थोडे थोडे पैसे बचत व गुंतवणूक करणे. आपल्या गुंतवणुकीसाठी नवीन पर्यायाचा शोध घेण्याची सतत धडपड ठेवली पाहिजे. श्रीमंतीची लक्षणे स्वीकारली की आपला प्रवास श्रीमंतीकडे व्हायला लागतो.

आपल्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत पैसे निर्माण करण्याचे व वाढवण्याचे प्लॅन तयार करणे. त्यांना ते प्लॅन सांगणे. पैसे येण्याऱ्या गोष्टींना प्रोत्साहन देणे. शेअर बाजार, गुंतवणूकदार, व्यवसाय, व्यवसायातील भागीदारी, बँका, पतसंस्था, मुदत ठेव (एफडी), आवर्ती ठेव (आरडी), सरकारी रोखे (गव्हर्नमेन्ट बाँड), सोने, विमा, आरोग्य विमा, मेडीक्लेम, सामाजिक कार्य यासारख्या महत्त्वपूर्ण विषयात पैशाची गुंतवणूक करुन त्यातून अजून पैसे निर्माण करणे ही श्रीमंतीच्या वाटेवरची खऱ्या अर्थाने वाटचाल आहे. श्रीमंत लोकांसोबत चांगले संबंध ठेवणे, आपल्या मित्रांसोबत चांगले व्यवहार करणे, अर्थशास्त्राचा अभ्यास करणे. स्वतःचा वेळ व बुध्दी वापरुन पैसे कमावण्याबरोबरच इतरांचा वेळ, श्रम व बुध्दी वापरुन पैसे निर्माण करणे ही श्रीमंतीच्या वाटेवरची पावले ठरतात.

- अमोल चंद्रकांत कदम, संपादक, नवी अर्थक्रांती
#rich #money #पैसा #गरीब #श्रीमंत